घरात बसून आईबाबाही कंटाळले आहेत, त्यांनाही घ्या तुमच्यात खेळायला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 01:46 PM2020-05-11T13:46:44+5:302020-05-11T13:49:23+5:30
तुम्ही तर खेळाच, पण आईबाबांनाही आज तुमच्यात खेळायला घ्या!
तुम्हाला लंगडी आवडते ना खेळायला, पण सध्या साधं खाली पार्किंग मध्येही जाता येत नाही तर लंगडी कुठे खेळणार?
आज आपण जे शिकणार आहोत ते तुम्ही एकटे खेळू शकता, तुमच्या भावंडांबरोबर खेळू शकता आणि आईबाबांना बरोबर घेऊनही करू शकता.
साहित्य:
कलर टेप/सेलो टेप/पांढरा आणि रंगीत खडू
कृती:
1) कलर टेप/ सेलो टेप/ खडू यातलं जे काही तुमच्याकडे उपलब्ध असेल ते घ्या.
2) घरातल्या कुठल्याही दोन खोल्या निवडा.
3) या खोलीतून त्या खोलीत अशी एक रेष काढा.
4) या रेषेवर ठिकठिकाणी रेषेवरून कसं चालायचं आहे याचे नियम बनवा.
5) काही ठिकाणी रेषेवरून चालताना उड्या मारायच्या, काही वेळा लंगडी घालायची, काहीवेळा तिरकं चालायचं आणि काहीवेळा आडवं.
6) या रेषेवरून झटपट आणि न पडता चालायचं.
7) रेष पूर्ण करण्याचं प्रत्येकाचं टाईमिंग घ्या.
8) जो सगळ्यात कमी वेळेत रेषेवरून न पडता रेष पूर्ण चालून जाईल तो जिंकला.
9) आणि हो लक्षात ठेवा, रेषेवरूनच चालायचं आहे, आजूबाजूने नाही. पाऊल रेषेवरून बाजूला जरी पडलं तरी तो गडी बाद.
10) घरात बसून बसून आईबाबाही कंटाळले आहेत, त्यांनाही घ्या तुमच्यात खेळायला, त्यांनाही जरा मज्जा येईल.