कोरोनाची भीती, ती आता कधी जाणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 12:15 PM2020-06-12T12:15:33+5:302020-06-12T12:16:19+5:30
भीती वाटली तर आईबाबा, आजीआबा कुणाशीतरी बोल.
कोरोनाच्या सारख्या बातम्या वाचून अजूनही मला सतत भीती वाटते. घराबाहेर पडता येत नाही, आईबाबा बाहेर जाऊन आले की लगेच अंघोळ करतात, आणलेल्या वस्तू एक तर बाहेर ठेवतात किंवा साबणाने धुवून घेतात. हे असं किती दिवस चालणार? माझी भीती कधी जाणार?
- मनोज शिंदे, कोल्हापूर
मनोज, तुला वाटणारी भीती अगदीच बरोबर आहे. अशी भीती आपल्यापैकी अनेकांना वाटतेय. कारण कोरोना ह्या आजाराचं स्वरूप. त्यामुळे पूर्वीसारखं आयुष्य जगायला लागायला आपल्याला वेळच लागेल. इतकं झटकन सगळं रुटीनला येणार नाहीये. आईबाबा जी काळजी घेताहेत ती आवश्यक आहे. पण त्यामुळे तू घाबरून जाऊ नकोस. तुला बाहेर जाऊ देत नाहीत, कारण त्यांना तुझी काळजी आहे. बाहेर कशामुळे संसर्ग होईल काहीच सांगता येत नाही. त्यामुळे काळजी वाटते आणि म्हणून आईबाबा बाहेर पडायला नको म्हणतात. त्यामुळे तुला कंटाळा आला तर वैतागून जाऊ नकोस आणि घाबरू ही नकोस. लवकरच परिस्थिती बदलेल आणि आपण रुटीन आयुष्याला नक्की सुरुवात करू. तुलाही लवकरच बाहेर खेळायला जाता येईल. खरंतर तुला तसं जाता यावं याचसाठी आता काळजी घ्यायची आहे.
भीती वाटली तर आईबाबा, आजीआबा कुणाशीतरी बोल. रडू आलं तर रडू थांबवून ठेऊ नकोस. या काळात आपल्या भावनांना वाट करून देणं खूप गरजेचं असतं. तू रडलास किंवा घाबरलास, तरी काहीही हरकत नाही. कुणीही तुला काहीही म्हणणार नाही.