कोरोनामुळे माझ्या आईबाबाचा पण जॉब जाईल का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 07:50 AM2020-04-11T07:50:26+5:302020-04-11T08:05:48+5:30
कोरोना नंतर काय होईल? लोकांना काम मिळणार नाही का? त्यांना पैसे मिळणार नाहीत का?
कोरोना नंतर खूप लोकांचे जॉब्ज जाणार असं मी वाचलं आहे. असं का होणार? म्हणजे मग आईबाबांचा पगारही कापणार का? त्यांचेही जॉब्ज जाणार का? - ईशान, कोल्हापूर
कोरोना नंतर जगभर आर्थिक मंदी येऊ शकते असं आर्थिक तज्ञ आता सांगत आहेत हे खरं आहे. कारण आता लॉक डाऊनमुळे अनेक व्यवसाय ठप्प आहेत. सगळ्याच व्यवसायात काही घरून काम करता येत नाही. जिथे घरून काम करता येत नाही तिथे सगळे आर्थिक व्यवहारही बंदच आहेत. त्यामुळे त्या कंपन्यांना मोठं नुकसान होतंय. तरीही सरकारने पुढचे तीन महिने कुणाचाही पगार कापू नये असं सांगितलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच नोक?्या जातील असं अजिबात नाही.
प्रश्न हातावर पोट असलेल्या माणसांचा जास्त आहे. किंवा गावाकडून शहरांमध्ये नोकरीच्या शोधात आलेल्या लोकांचाही. कामधंदे बंद असल्याने अनेक जण गावाकडे परतले आहेत. कोरोनाची आपत्ती टळली की ते त्यांना काय आणि कसं काम मिळेल हे आताच सांगता यायचं नाही. त्यांच्या गावाकडे कामधंदा नाही म्हणून ते शहरात आले होते. पण कोरोना नंतरच्या जगात कदाचित गावाकडेच त्यांना काही काम उपलब्ध होईल. मग ते परतून शहराकडे यायचेही नाहीत. किंवा शहरात ते ज्यांच्याकडे काम करत होते ते त्यांना पुन्हा कामावर घेतील. कारण व्यवसाय सुरळीत सुरु झाले की मनुष्यबळाची आवश्यकता सगळ्यांनाच असणार आहे.
त्यामुळे सगळ्यांचीच कामे जातील असं मुळीचच नाहीये. त्यामुळे अजिबात घाबरून जायचं कारण नाही. यापुढचा काळ मोठा आव्हानात्मक आहे हे मात्र खरं. आपण सगळेच त्यासाठी तयार राहूया.