कोरोना कोरोना खेळताय का तुम्ही? विषय कट म्हणजे कट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 08:34 AM2020-04-11T08:34:32+5:302020-04-11T08:38:15+5:30
छान काहीतरी कुकिंग, स्कुल स्कुल, झालं तर गाण्याचे रिअॅलिटी शो, ऑफिस ऑफिस खेळा. पण डॉक्टर डॉक्टर खेळायचं नाही.
.आज थोडं जरा बोलायचं होतं तुमच्याशी!
म्हणजे आपण सगळी मुलं शहाणीच आहोत, पण कधीकधी खेळताना आपण गडबड करतो, हे आपल्या लक्षातच येत नाही. आपल्या आईबाबांच्या पण लक्षात येत नाही.
तर त्याचं असं झालं, अमेरिकेत एका डॉक्टरकाकांनी एक पेपरमध्ये अलिकडेच एक लेख लिहिला. एवढे मोठे ते डॉक्टरकाका, पण घाबरले होते.
म्हणाले, मी घाबरलो आहे तर हेल्प मी!
सगळ्यांना बरं करणारे डॉक्टरकाकाच का, हेल्प मी म्हणायला लागले?
तर त्यांच्या असं लक्षात आलं की, एक मुलगी सकाळी उठली की, डॉक्टर डॉक्टर खेळतेय. म्हणजे आपण सगळे खेळतोच ते! जोरात टुचूक करतो आईला-आजीला. एवढा आपला बाबा, पण आपण टुचूक केलं खोटं खोटं की कसा ओरडतो.मजा येते.
ैआजोबांचं बीपी बघतो, कधी गोळ्या देतो, आणि सांगतो, कडू असल्या तरी घ्यायच्या. घेताना रडायचं नाही.
तर तशीच ही मुलगी पण घरात डॉक्टर डॉक्टर खेळायची. पण ती तिच्या लहानशा जिराफ टेडीला खोटं खोटं थर्मामिटर पाहून, त्याला ताप आलाय का हे पहायची.
सतत त्याला काहीतरी औषध द्यायची. तिला तोच खेळ आवडला.
तिला वाटत होतं की, आपल्या खेळण्यांना पण कोरोना झालाय.
मग डॉक्टर काकांनी अजून छोटय़ा छोटय़ा मुलांना फोन केले, तर त्यापैकी बरेच जण असं खेळत होते.
-म्हणून डॉक्टर काका घाबरले आणि म्हणाले, हेल्प मी, हे असं खेळू नका.
एकदम विषय कट म्हणजे कट, फायनल कट.
छान काहीतरी कुकिंग, स्कुल स्कुल, झालं तर गाण्याचे रिअॅलिटी शो, ऑफिस ऑफिस खेळा. पण डॉक्टर डॉक्टर खेळायचं नाही.
बाकी टेन्शन नहीं लेने का बॉस.
रिलॅक्स रहने का..