coronavirus : लॉकडाऊन वाढलं ना ? हे घ्या असा शिवा स्वतःचा मास्क 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 06:53 PM2020-04-11T18:53:04+5:302020-04-11T19:05:47+5:30

मास्क कसा शिवायचा? चला, आज हे शिकूनच घेऊया!

coronavirus: lockdown- make your mask @ home. | coronavirus : लॉकडाऊन वाढलं ना ? हे घ्या असा शिवा स्वतःचा मास्क 

coronavirus : लॉकडाऊन वाढलं ना ? हे घ्या असा शिवा स्वतःचा मास्क 

Next
ठळक मुद्देमास्क तर तयार झाला, तो स्वच्छ कसा ठेवायचा ?

- गौरी पटवर्धन

तर आपला मास्क आपण बनवू! आई-बाबांना, घरातल्या सगळ्यांनाच मास्क बनवून देऊ!
मास्क बनवण्यासाठी आपल्याला एक तरी जुना टीशर्ट लागेल. कारण मास्क कॉटनचा असला तरी त्याची कानामागे अडकवायची पट्टी मात्र थोडी तरी स्ट्रेचेबल असावी लागते. ती आपण टीशर्ट पासून बनवू शकतो.
मास्क कसा बनवायचा?
1.  मास्क बनवण्यासाठी आपल्याला कापडाचा आयताकृती तुकडा कापून घ्यायचा आहे.  त्याची लांबीरुंदी ठरवण्यासाठी आपल्याला शिवणाची मेजरींग टेप लागेल. 
2. त्या टेपने तुमच्या नाकाच्या वरच्या भागापासून ते हनुवटीच्या खालपयर्ंत किती इंच होतात ते मोजा.
3.  जर का तुमच्याकडे शिवणाची टेप नसेल तर एका साध्या दोरीने हे माप घ्या आणि मग ती दोरी नेहेमीच्या फूटपट्टीवर ठेऊन किती इंच होतात ते बघा. 
4. या रुंदीत अजून दोन इंच जास्त घ्या. ही झाली आपल्या मास्कची रुंदी.
5.  त्यानंतर मास्कची लांबी ठरवण्यासाठी तुमच्या दोन्ही गालांच्या मध्याच्या पुढे टेप येईल असा धरून किती इंच होतात ते बघा. 
6. हे माप घेताना टेप नाकाच्या वरून घ्या. या लांबीत अजून एक इंच वाढवा. कानामागे अडकवायची पट्टी शिवण्यासाठी तेवढं कापड जास्त लागणार आहे. ही झाली तुमच्या मास्कची लांबी.


7. आता ज्या कापडाचा मास्क बनवायचा आहे ते कापड टेबलवर किंवा जमिनीवर सपाट करून ठेवा. त्यावरच्या सुरकुत्या सरळ करून घ्या. 
8. त्यावर तुमच्या मापाच्या मास्कचा आयत पेन्सिल किंवा खडूने काढा. तुम्ही जर शहाण्या मुलांसारखे त्या मास्कला चारी बाजूंनी नीटनेटकी दुमड घालणार असाल तर तुम्ही घेतलेल्या मापापेक्षा पाऊण इंच लांबी आणि रुंदी जास्त घ्या. कारण तेवढं कापड दुमड घालण्यात जाणार आहे.
9. तुम्ही जर साडी किंवा ओढणीसारख्या पातळ कपड्याचा मास्क बनवणार असलात तर त्या कपड्याच्या चार घड्या घ्या. टीशर्ट किंवा रुमालाचा दोन घड्या पुरतील.
10. आता हे कापड तसंच ठेऊन चांगल्या धारेच्या कात्रीने तो आयत कापून घ्या. त्याला चारही बाजूंनी दुमड घालून हातशिलाई करा. 
11. मग टीशर्टच्या कापडाची पट्टी कापून घ्या. त्या पट्टीला दुमड घालून शिवून घ्या.म्हणजे त्याचे दोरे निघणार नाहीत. 
12. मग या पट्टीचे दोन भाग करा. दोन्ही भाग मास्कचा रुंदीच्या बाजूला शिवून टाका. 
13. आता या मास्कला रुंदीमध्ये तीन-चार प्लेट्स घाला. म्हणजे तो मास्क नाकावर घातल्यावर त्याने नाक चेपलं जाणार नाही. 
14. एकदा तो मास्क चेहे?्यावर लावून बघा. आणि मग त्याच्या पट्टीची लांबी जेवढी पाहिजे आहे तिथे तिला गाठ मारून टाका. तुमचा मास्क तयार आहे.
घरातल्या मोठ्या माणसांसाठी मास्क बनवतांना या मापापेक्षा लांबी आणि रुंदी एक एक इंच जास्त घ्या. कारण मोठ्या माणसांचा चेहेरा मोठा असतो.

- आता मास्क तर तयार झाला, तो स्वच्छ कसा ठेवायचा ते शिकूया उद्या!!

Web Title: coronavirus: lockdown- make your mask @ home.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.