coronavirus:किरा आणि तिचे आजोबा पहा कसं हरवतात कोरोना कंटाळ्याला ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 01:40 PM2020-04-11T13:40:45+5:302020-04-11T13:53:32+5:30
रस्त्याच्या अलीकडे किरा आणि पलीकडे तिचे आजोबा-- सोशल डिस्टन्सिंग पाळून पाहा कशी मजा करताहेत ते!
किरा निली ही 6 वर्षाची मुलगी. ती अमेरिकेतल्या नैशव्हिले मध्ये राहाते. मार्शल निली हे तिच्या आजोबांचं नाव. किराचं आपल्या आजोबांवर खूप प्रेम. आपल्या आजोबांना भेटल्याशिवाय, त्यांना मिठी मारल्याशिवाय, त्यांच्याशी खेळल्याशिवाय किराला चैनच पडायची नाही. किराचं आणि आजोबांचं घर अगदी जवळच. त्यामुळे किरा आपल्या आजोबांना रोज भेटू शकायची.
पण कोरोना व्हायरसमुळे किराची आई तिला आजोबांना भेटू द्यायची नाही. आजोबा म्हातारे. त्यांना कोरोना व्हायरसची लागण होऊ नये म्हणून किराची आई किराला आजोबांना भेटू देत नव्हती.
सुरूवातीला आपल्या आजोबांना न भेटणं किराला फारच जड गेलं. दिवसातून एकदा ती खिडकीतून आजोबांना बघू लागली. आजोबा फिरायला बाहेर पडले की तिही बाहेर पडायची.आजोबा रस्त्याच्या एका टोकाला आणि किरा एका टोकाला. दोघांमध्ये सहा फुटांचं अंतर. तिथून ती आजोबांशी गप्पा मारायची.
एकदा किराला वाटलं की आपण आजोबांबरोबर डान्स करू या. म्हणून ती रस्त्याच्या एका कडेला उभं राहून नाचू लागली. तिचा नाच बघून आजोबाही नाचू लागले.
सध्या आजोबा आणि किरा एकमेकांना असेच भेटतात. एकमेकांमध्ये अंतर ठेवून दोघंही खूप मजा करतात. किरा आपल्या आजोबांच्या जवळ जाण्याचा हट्ट करत नाही. पण आजोबांना रोज भेटण्याचा, त्यांच्याशी खेळण्याचा एक नवाच मार्ग तिनं शोधून काढला आहे. हा मार्ग किराच्या आईलाही मान्य आहे.
आता आजोबा एका टोकाला खुर्ची टाकून किराचा खेळ बघतात. किरा आपण काढलेलं चित्र आजोबांना लांबूनच दाखवते. किराचा बॉल आजोबांकडे गेला की आजोबा किक मारून किराकडे देतात .सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत आजोबा आणि किरा मस्त खेळत असतात.