coronavirus : जमावबंदी म्हणजे काय? ती का लावतात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 08:11 PM2020-04-01T20:11:43+5:302020-04-01T20:13:18+5:30
आता आपण घरात बसणं हेच कोरोना शत्रूला हरवण्याचं सगळ्यात मोठं शस्र आहे.
माणसांच्या जिवाला किंवा आरोग्याला काही कारणाने धोका असेल तर माणसांना एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी जमावबंदी लागू केली जाते. जी आपल्या महाराष्ट्रात सुरुवातीला लागू केली गेली होती. त्यानंतर येते ती संचारबंदी. सध्या आपल्या देशात सर्वत्र लॉकडाउन आहे. पण आधी जमावबंदी म्हणजे काय? जमावबंदीत 5 पेक्षा जास्त लोकांनी जमावबंदी लागलेल्या भागात एकत्र यायला परवानगी नसते. कोरोना विषाणू स्पर्शातून, शिंक, थुंकी यांच्यातून पसरत असल्याने माणसांमध्ये या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी माणसांनी एकत्र येण्यावर किंवा जमण्यावर बंदी घातली गेलेली आहे. जेणोकरून कोरोना विषाणू आपल्याकडे पसरू नये. जमावबंदीचा आदेश जिल्हाधिकारी देतात. तो सगळ्यांनी पाळायचा असतो.
जमावबंदीच्या काळात गरजेच्या सेवा जसं की औषधाची दुकानं, भाजीपाला, दूध, रुग्णालये, बँका चालू असतात बाकी सगळं बंद असतं. आता आपल्याकडे वाहतूक व्यवस्थाही बंद केलेली आहे. म्हणजे तुम्हाला कुठे गावाला जाता येणार नाही. कारण एके ठिकाणहून दुसरीकडे जाताना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता असते. एखादा कोरोना झालेला व्यक्ती दुस:या गावाला गेला अंडी तिथल्या लोकांच्या संपर्कात आला तर त्यांनाही कोरोना होण्याची भीती असते. असं होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्था म्हणजे ट्रेन्स आणि बससेवा बंद केलेली आहे. ही जमावबंदी आपल्या भल्यासाठी आहे हे लक्षात ठेवा. आणि मित्रमैत्रिणींकडे खेळायला जाण्याचा किंवा बिल्डिंगखाली सगळ्यांना जमवून खेळण्याचा हट्ट करू नका. आता आपण घरात बसणं हेच कोरोना शत्रूला हरवण्याचं सगळ्यात मोठं शस्र आहे.