coronavirus : पॅन्डेमिक म्हणजे काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 03:57 PM2020-03-28T15:57:05+5:302020-03-28T16:03:23+5:30
कोरोना हे पॅन्डेमिक आहे, असं जागतिक आरोग्य संघटना म्हणते. हे काय असतं नक्की?
घरात आईबाबा, आजी आबा सगळे सतत कोरोनाबद्दल बोलत असतील ना? हात धुवा, स्वच्छता ठेवा, तोंडाला सारखा हात लावू नका, डोकं खाजवू नका, नाक कुरतडू नका. खूप खूप सूचना! टीव्हीवरही सतत सगळे कोरोनाबद्दलचं बोलतात, वर्तमानपत्रतही त्याचबद्दल लिहितात! त्यातलं काही तुम्हाला समजत असेल काही नसेल.
मग एक काम करूया, कोरोनाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊया. तसंच तुमच्या मनातल्या शंका आणि प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रय} करूया.
तर कोरोनाबद्दल आई-बाबा, टीव्हीवरचे अँकर्स, वर्तमानपत्रतल्या बातम्यांमध्ये तुम्ही एक शब्द पुन्हा पुन्हा ऐकत/ वाचत असाल.. पॅन्डेमिक
तुम्हाला प्रश्न पडला असेल, पॅन्डेमिक म्हणजे नक्की काय? ‘कोरोना पॅन्डेमिक आहे.’ असं म्हणताना मोठय़ांच्या चेह:यावर येणारी काळजीही तुम्ही नोटीस केली असेल.
एपिडेमिक किंवा महामारी
म्हणजे काय?
ज्यावेळी एखादा आजार चटकन जगात सर्वत्र पसरतो आणि त्याची लागण निरनिराळ्या देशांमध्ये खूप लोकांना होते तेव्हा त्या आजाराला महारोगराई किंवा महामारी म्हटलं जातं. असा आजार कुठल्याही एका देशापुरता किंवा एका खंडापुरता नसतो, तर तो जगभर सर्वत्र झपाटय़ाने पसरतो.
महामारी कोण जाहीर करतं ?
एखाद्या रोगाचे किंवा आजाराचे पेशंट्स जगभर सगळीकडे दिसायला लागले, रोग संसर्गजन्य असल्याने झपाटय़ाने पसरू लागला की जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यूएचओ त्यारोगाची संपूर्ण माहिती घेते. मिळालेली माहिती योग्य आहे का ते तपासते आणि त्यानंतर डब्ल्यूएचओ एखाद्या रोगाला महामारी किंवा महारोगराई म्हणून घोषित करते.
महामारीतही प्रकार असतात का?
हो, हा साथीचा, संसर्गजन्य रोग जर जागतिक पातळीवर पसरला असेल, तर त्याला पॅन्डेमिक म्हटलं जातं आणि जे एखाद्या देशापुरतं किंवा प्रांतापुरतं घडतं त्याला एपिडेमिक म्हणजे स्थानिक महामारी म्हणतात. कोरोनाची सुरुवात चीनच्या वुहान प्रांतात झाली असली तरी कोरोनाचा व्हायरस झटपट जगभर पसरलेला आहे म्हणून डब्ल्यूएचओने कोरोनाला पॅन्डेमिक म्हणून जाहीर केलं आहे.