coronavirus : काय बिघडलं मस्त पिझा, नूडल्स, तवा पुलाव मागवला तर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 05:40 PM2020-04-07T17:40:06+5:302020-04-07T17:42:33+5:30
घरात बसून बसून इतका कंटाळा आलेला असताना मोबाइल अॅप्सवरून चमचमीत काहीतरी खायला मागवलं तर काय बिघडतं?
शहरात राहणा-या अनेक मुलांचा सध्या एकच प्रश्न आहे की, आपल्याला हवे असलेले मस्त मस्त पदार्थ का नाही मागवायचे; पण बाहेरून? त्यात काय आहे, मोबाइल घ्यायचा, एक नेहमीचं अॅप उघडायचं, आणि करायचा ऑर्डर पनीर टिक्का किंवा किंवा पावभाजी किंवा चाट!!! म्हणजे नो उल्लू बनाविंग. घरोघरीच्या आयांना मुलं म्हणतायत, की मुख्यमंत्री काकांनी सांगितलं ते आम्ही ऐकलं आहे की, कफ्र्यू असला तरी अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, मग बाहेरून जेवण मागवणं हे अत्यावश्यक नाही का? काय ते रोज रोज भाजीपोळीच खायची? काय बिघडलं मस्त पिझा, नूडल्स, तवा पुलाव मागवला तर? हॉटेलवाले काका कुठं सुटीवर गेलेत का? घरात बसून बसून इतका कंटाळा आलेला असताना आपल्या आवडीचं चटकमटक मस्त मस्त जेवण हे तर ‘मस्ट’ आहे ना?
- हे प्रश्न बरोबरच आहेत. पण अनेकदा प्रश्न बरोबर आणि त्याची उत्तरं तर अगदी सोपी सरळ दिसत असली तरी ती उत्तरं योग्यच असतील आणि आपला ताळा जुळेल असं अजिबात नाही. त्यामुळे बाहेरून का सध्या काही मागवायचं नाही याची ही यादी जरा चेक करून पहा. आणि मग ठरवा तुमचं तुम्हीच.
1. तर मुख्यमंत्री काका म्हणाले की, अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा सुरूराहतील; पण याचा अर्थ असा नाही की पिझा आत्ताच्या आत्ता खाल्ला नाही तर काही प्रॉब्लेम होईल.
2. सध्या आपण सगळेच घरात बंद आहोत. आपल्या घरी जेवायला आहे, आपण जेवतोय ते पुरेसं नाही का?
3. अजून एक महत्त्वाचं म्हणजे अनेक मुलं या संकटकाळात अशीही आहेत की, ज्यांना सकाळी जेवायला मिळालं तर रात्री काय खाणार असा प्रश्न आहे. त्या मुलांना कशी मदत करायची हे आईबाबांशी बोलून ठरवायचं, की आपण पिझा खायचा आग्रह करायचा?
4. अॅपवाले काकांचा जरी घरी जेवण आणून देणं हा बिझनेस असला तरी सध्या वाहनांना रस्त्यावर बंदी आहे. असं असताना आपण रस्त्यावरची गर्दी वाढवणार का?
5. अॅपवाले, जेवण घरी आणून देणा:या काकांनीपण घरात थांबायला हवं, ते अनेक लोकांना सतत भेटत राहिले तर ते नाही का डेंजर झोनमध्ये येणार?
6. मुख्य म्हणजे आपला सगळा समाज संकटात असताना आपण आपल्या जिभेचे चोचले पुरवत बाहेरचं खाऊन आजारी पडलो तर कोण रिस्क घेणार?
7. त्यापेक्षा बाबाला, आईला स्वयंपाकात मदत करत आपणच घरी स्वयंपाक करून गरमगरम जेवणं सोपं नाही का?
पिझा-नूडल्स तर काय कधीपण खाता येतील, बाहेरून मागवून .. बरोबर ना?