आईबाबा सांगा , तुमच्यासाठी ऑफिसचं काम महत्वाचं आहे की मुलं ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 10:48 PM2020-04-09T22:48:44+5:302020-04-09T22:54:08+5:30
सारखं काय काम काम? मला वाटलं, आई वर्क फ्रॉम होम आहे, म्हणजे मज्ज!पण ती तर सारखी आपली कामातच असते. हे काय??
तुमची चिडचिड खूप झालीये ना? होणारच. माझीपण झाली आहे. आईबाबा दोघं घरी आहेत. मस्त त्यांच्याशी खेळू, निवांत कुशीत लोळालोळी करू, तर ते नाही. यांचं आपलं तुझं तुझं खेळ रे, मला वर्क फ्रॉम होम आहे. काय यार, यांचा प्रॉब्लेम आहे. काय सारखं ते वर्क फ्रॉम होमचं कौतुक? घरातूनच काम करायचं होतं तर मग घरी कशाला राहता? जा ना, जा ना ऑफिसला. तिकडेच काम करा. आई निदान ऑफीसला जाते ते तरी बरं असतं, घरी आली की आपली असते. मस्त खेळते, गप्पा मारते.
इथं तर ते पण नाही.
रात्र होऊन जाते, पण तिचं तेच, थोडं राहिलंय रे काम, आता थोडं. आणि ते संपलं की म्हणते दमले आज, लवकर झोपू दे. म्हणजे मुलांपेक्षा या आईबाबांन काम इम्पॉर्टण्ट वाटतं का? आम्हाला काही इम्पॉर्टन्स, काही व्हॅल्यू आहे की नाही. एरव्ही माया मित्रंची आई जॉब करत नाही, घरी असते तरी मी काही तक्रार केली नाही. करत नव्हतो. आता वाटलं आई घरी आहे तर मज्जा. पण नाही ही आपली ऑफिसच्या वेळेआधी लॅपटॉप घेऊन बसते. आणि वर मला म्हणते काय, बाळा, यापुढे सगळीकडे जॉब लॉसची भीतीआहे. आपण भरपूर काम केलं पाहिजे, नोकरी टिकवली पाहिजे. माझं काम पण महत्वाचं आहे. हिचं काम महत्वाचं आहे पण आमच्या शेजारच्या काव्याची आईपण जॉब करते. तिला तर पूर्ण सुटी आहे. तिचं काम नाही का महत्वाचं? तिला नाही का नोकरी जाण्याची भीती?. ती तर शाळेत टीचर आहे. किती महत्वाचं काम करते. माझी आई तर साधी पत्रकार आहे.
संताप झाला माझा.
म्हणून ऊर्जा तूुला हे पत्र लिहिलं, आता तू जर बोअर मारणार असशील तर मी आईच्या मोबाइलवर तुला भेटतो, तू सांगतेस ते व्यायाम करतो, ते बंद करुन टाकीन सांगून ठेवतो.
-तुझा चिडलेला मित्र.
(माझं नाव छापू नकोस, नाहीतर लगेच घरी ग्यान-डोस सुरु होईल!)