मुलं ज्या सायबर स्पेसमध्ये वावरणार, त्याची माहिती पालकांना असलीच पाहिजे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 06:03 PM2020-07-11T18:03:48+5:302020-07-11T18:14:35+5:30
ऑनलाइन मुलं - तज्ञ काय म्हणतात ? भाग ७
ऍड. वैशाली भागवत, प्रसिद्ध सायबर लॉ तज्ञ
सायबर स्पेसबद्दल मुलांशी संवाद कसा साधायचा हा प्रश्न बहुतेक पालकांना पडलेला असतो. याबाबत काही टिप्स आजच्या या शेवटच्या भागात बघूया!
1) आम्हाला काही ते ऑनलाईन मधलं कळत नाही या विचार करण्याच्या पद्धतीतून पालकांनी आधी बाहेर पडलं पाहिजे. सायबर स्पेसमध्ये मुलांना जाऊ द्यायचं असेल तर इंटरनेटची माहिती पालकांनी करून घेणं, इ-शिक्षित होणं आवश्यक आहे.
2) मुलं जेव्हा ऑनलाईन जातील तेव्हा तुम्हीही त्यांच्याबरोबर सायबर स्पेसमध्ये वेळ घालवा. त्यांना त्या आभासी जगात एकट्यांना सोडू नका.
3) सायबर स्पेस मधल्या धोक्यांविषयी माहिती घ्या, ती मुलांना द्या.
4) मुलांना समजेल अशा भाषेत लैंगिक छळाबद्दल सांगा. इंटरनेटवर कशा पद्धतीने फसवणूक होऊ शकते याची माहिती द्या.
5) मुलांशी खुला संवाद करा. ते ऑनलाईन जाऊन काय करतात हे पालक म्हणून तुम्हाला का समजून घ्यायचं आहे, त्यामागे तुमची काय भावना आहे, तुम्हाला काळजी का वाटते ते मुलांना सांगा. त्यांना विश्वासात घ्या.
6) गॅजेट्स आणि ऑनलाईन वावराचे, स्क्रीन टाईमचे काही नियम करा आणि पाळा.
7) मुलं ऑनलाईन कुठले गेम्स खेळतात, कुठले सिनेमे आणि सीरिअल्स बघतात याकडे लक्ष ठेवा.
8) मुलांचा ऑनलाईन सर्च ट्रॅक करा. त्यात तुम्हाला काही आक्षेपार्ह वाटलं तर ते ब्लॉक करा. किंवा पेरेंटल कंट्रोल्सचे ऑप्शन्स वापरा.
9) मुलं जिथे कुठे बसून ऑनलाईन जाणार असतील ती जागा तुमच्या नजरेसमोरची हवी. खोलीचं दार आतून बंद करून ऑनलाईन जाण्याची परवानगी मुलांना देऊ नका.
10) अनोळखी माणसांशी मुलां फेस टू फेस ऑनलाईन मिटिंग तुमच्या अपरोक्ष प्लॅन करण्याची कधीही परवानगी देऊ नका. व्हिडीओ चॅटिंग मूल कुणाशी आणि का करणार आहे हे पालकांना माहीतच हवं.
11) मुलांशी संवाद साधत असताना पासवर्ड, खासगी तपशील इंटरनेटवर भेटलेल्या कुठल्याही अनोळखी व्यक्तीला न देण्याबद्दल जागरूक करा.
12) मुलांना त्यांचे कुठलेही फोटो अपलोड करायचे असतील तर पालकांची परवानगी घेऊनच ते करता येतील अशी अट सायबर स्पेस वापरायला देताना घाला.
13) वॉच हिस्ट्री वेळोवेळी चेक करा, मुलांच्या वर्तणुकीतल्या बदलांकडे लक्ष ठेवा.
14) इंटरनेट, सायबर स्पेस मधल्या धोक्यांविषयी जसं बोलाल तसंच ज्या त्या वयातल्या मुलांना बघण्यासारखं काय काय इंटरेस्टिंग आहे याचीही माहिती द्या.
15) मुलांच्या कुठल्याही गॅजेट्सना पासवर्ड नकोत. आणि असतील तर ते तुम्हाला माहित असले पाहिजेत, त्यांना हवं तेव्हा तुम्हाला करता आलं पाहिजे. मोबाईल, टॅब, लॅपटॉप देताना हा नियम अत्यावश्यक आहे.
सायबर स्पेसविषयी मुलांशी बोला आणि त्यानं सुरक्षित ठेवा.
(शब्दांकन: मुक्ता चैतन्य )