एक दिन का अर्थमंत्री बनने का क्या ? घ्या सूत्र हातात आणि घराचं बजेट तयार करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 09:05 AM2020-04-10T09:05:57+5:302020-04-10T09:09:31+5:30
दर महिन्याला किती पैसे लागतात? करा बरं अंदाज, की घर चालवायला आईबाबांना एकूण किती खर्च येत असेल?
- गौरी पटवर्धन
किती वेळा तुम्ही एखादी गोष्ट मागितली आणि आईवडिलांनी दिली नाही? किंवा तुम्ही एक वस्तू मागितली तर त्यांनी त्याऐवजी भलतंच काहीतरी दिलं? आठवा बरं, खूप वेळा झालं असेल ना? आणि तरीही तुम्ही हट्ट केल्यावर त्यांचा सगळ्यात आवडता डायलॉग कुठला?
‘पैसे काय झाडाला लागतात का?’’
‘अक्कल नाही एक रुपया कमावण्याची आणि चालले शायनिंग मारायला!’’
आणि मग तुम्हाला काय वाटलं असेल सांगू? .. फक्त मला काहीतरी हवं असेल की बजेट नसतं. बाकी सगळ्यांना पाहिजे ते घेऊन देतात! मग हा तिढा सोडवायचा कसा? तर त्यावर इलाज एकच! आपण आईवडिलांना महिन्याचा घरखर्च लिहायला मदत करायची.
आधी आपण घरात दर महिन्याला काय काय खर्च असतो त्याची यादी करायची. काय काय येईल त्या यादीत? दूध, किराणा, भाजी, फळं, विजेचं बिल, बचत.. तुम्ही करा विचार. असे किती आयटम तुम्हाला सापडतात? फुलस्केप पेपरवर याची यादी करा. त्यापुढे दोन कॉलम आखा. पहिल्या कॉलममध्ये तुमच्या मते या गोष्टीसाठी अंदाजे किती खर्च होत असेल तो आकडा लिहा. तुमचा कॉलम पूर्ण भरला की मग आई आणि वडिलांना विचारून त्या त्या गोष्टीसाठी खरंच किती खर्च होतो ते दुस?्या कॉलममध्ये लिहा. ते लिहून झालं की ते दोघं तुम्हाला अजिबात न सुचलेले खर्च सांगतील. ते पण त्याच्यात वाढवा. त्याचेही आकडे लिहा.आता आईबाबांनी आकडे सांगितलेल्या कॉलमची बेरीज करा. दर महिन्याला आपलं घर चालवण्यासाठी किती पैसे लागतात ते तुमच्या लक्षात येईल. आणि मग आपल्याला पाहिजे असलेली वस्तू बजेटमध्ये बसू शकते का आणि ती घेणं इतकं महत्वाचं का हे तुमचं तुम्हीसुद्धा ठरवू शकाल!