कागदांचा मोठा मुखवटा बनवायची सोपी ट्रिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 06:10 PM2020-06-08T18:10:01+5:302020-06-08T18:11:04+5:30
कागदाच्या पट्ट्य़ांचा फेसमास्क
तुमच्या घरात चार पाच दिवसांची वर्तमानपत्रंची रद्दी आणि वाटीभर कणिक असेल तर तुम्ही एक भारी गोष्ट करू शकता. अर्थात, कणिक नुसती घरात असून काही उपयोग नाही, आईने ती तुम्हाला दिली सुद्धा पाहिजे. पण जर का तुम्ही एक किंवा निदान अर्धी वाटी कणिक मिळवण्यासाठी आईला पटवलंत, तर तुम्ही काहीतरी भारी करू शकता.
सगळ्यात आधी त्या अर्धी वाटी कणकेत भरपूर पाणी घालून ती चांगली ढवळून घ्या. त्यातल्या गुठळ्या हाताने मोडा. मग ते मिश्रण गॅसवर ठेऊन मंद आचेवर ढवळत रहा. कणिक चांगली शिजली की त्याची खळ तयार होईल. तुमच्यापैकी काही जण पतंग चिकटवायला घरी खळ करत असतील किंवा काही जणांच्या आईवडिलांना खळ बनवता येत असेल. त्यांच्याकडून तुम्हाला डायरेक्ट खळ बनवून मिळाली तर उत्तम, फक्त ती कशी केली ते नीट बघून शिकून घ्या.
आता वर्तमानपत्रच्या वीतभर लांबीच्या आणि दोन बोटं रुंदीच्या पट्ट्या कापा किंवा फाडा. आता साधारण आपल्या चेहे?्याच्या मापाची कढई घ्या. ती जमिनीवर पालथी घाला. आता त्याच्यावर एक वर्तमानपत्र सपाट करून घाला. त्या वर्तमानपत्रवर कापलेल्या पट्ट्या खळीने चिकटवा. सगळी कढई भरली की जरा थांबा. खळ वाळली की त्यावर पट्ट्यांचा अजून एक थर द्या. तो थर वाळला की अजून एक थर. असं करत करत सुमारे अर्धा सेंटीमीटर जाडीचा थर तयार झाला की ते सगळे थर कडक वाळू द्या. मग तो अर्धगोल सुलटा करा. आतली कढई घासून आईला परत द्या. (म्हणजे ती पुढच्या वेळी आपल्याला परत मिळू शकते.)
हा तुमच्या मुखवट्याचा बेस आहे. आता यावर तुमच्या चेहे?्याचा अंदाजाने नाक, तोंड, डोळे पेन्सिलने काढा आणि कटरने कापा. आणि मग उरलेला मुखवटा तुम्हाला पाहिजे तसा रंगवून घ्या. हा मुखवटा घालून तुम्ही इतरांना घाबरवू शकता. किंवा असे जास्त मुखवटे बनवून रंगीत रंगवून भिंतीवर शोपीस म्हणून टांगू शकता.