शेंगदाण्याच्या कुटाची चिक्की, करके देखो इझी है !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 03:58 PM2020-06-10T15:58:34+5:302020-06-10T16:00:08+5:30
भूक भूक ? आपणच एखादी सोप्पी मज्ज बनवली तर?
आपण सारखे घरात अडकून पडलो की एक मोठाच प्रॉब्लेम होऊन बसतो. म्हणजे बरेच प्रॉब्लेम्स होतात. पण हा त्यातल्या त्यात मोठा प्रॉब्लेम असतो. आणि तो जितका आपल्याला असतो, तितकाच आईला पण असतो. त्यामुळे तो अजूनच गंभीर होऊन बसतो. कुठला माहितीये?
भूक!
आपल्याला सतत, दर थोड्या वेळाने लागणारी वेगवेगळ्या पदार्थांची भूक ही आपल्या आणि आईच्याही दृष्टीने मोठीच डोकेदुखी असते. कारण आपल्याला भूक तर असते, पण त्यावेळी पोळी भाजी, आमटी भात असलं काही आपल्याला नको असतं. आधीच आईला सध्या जास्त काम पडत असल्यामुळे तीही वैतागते. आणि शेवटी आपल्याला सांगते, ‘खरी भूक असेल तर भाजी पोळी खा!’
तर त्यापेक्षा मध्ये मध्ये खायला आपणच काहीतरी बनवलं तर? एक एकदम सोप्पा आयटम आहे. तो म्हणजे शेंगदाण्याच्या कुटाची चिक्की.
त्यासाठी एक वाटी शेंगदाण्याचा कूट घ्यायचा. अर्धी वाटी साखर घ्यायची. आपल्याला चिक्की करायला सुरुवात करण्याच्या आधी एका ताटाला आणि वाटीला थोडा तुपाचा हात लावून ठेवायला लागेल. कारण चिक्की फार पटकन होते आणि ती झाल्याच्या नंतर हे सगळं करायला वेळच नसतो. शिवाय एका सुरीला पण तूप लावून ठेवा.
आता एका कढईत अगदी चमचाभर तूप घाला. त्यात साखर घाला. गॅस चालू करा, पण तो मध्यम किंवा बारीक ठेवा. जरा वेळात सगळी साखर वितळेल, ती वितळेपयर्ंत सतत हलवत रहा. साखर वितळली की त्यात शेंगदाण्याचा कूट घाला. तो पूर्ण मिसळला की गॅस बंद करा आणि ते मिश्रण ताटात लावून ठेवलेल्या तुपावर ओता आणि तूप लावलेल्या वाटीने एकसारखं पातळ थापा. ते गार व्हायच्या आत तूप लावलेल्या सुरीने त्याच्या वड्या पाडा.
ही चिक्की करायला अक्षरश: पाच मिनिटं लागतात आणि नंतर ती गार व्हायलाही पाचच मिनिटं लागतात. शक्यतो सुरुवातीला घरातल्या कुठल्यातरी मोठ्या माणसाला बरोबर घेऊन हा उद्योग करा. आणि मग गंमत बघा. काही दिवसांनी घरातली मोठी माणसं तुमच्याकडे चिक्कीची फर्माईश करायला लागतील!