घरातल्या घरात एका जागी करा जॉगिंग , व्हा फ्रेश !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 09:43 AM2020-04-11T09:43:18+5:302020-04-11T09:44:04+5:30
आधी वॉर्मअप करायचा. घरातल्या घरात थोडं चालायचं आणि त्यानंतर जॉगिंग करायचं.
मला माहीतच होतं, काल मी सांगितलेला व्यायाम कोणालाच जमला नसणार ते!
अर्थात सगळंच आपल्याला आलं पाहिजे, असं नाही. कारण प्रत्येक खेळासाठी व्यायामाचे प्रकारही वेगवेगळे असतात. ते व्यायाम केले, की त्या खेळात आपल्याला जास्त फायदा होतो. त्यामुळे बॅडमिंटन, टेनिस, क्रिकेट. असा कोणताही खेळ तुम्ही खेळत असाल, तर त्यासाठी लागणारे व्यायामही नक्कीच शिकून घ्या.
काल आपण अवघड व्यायामप्रकार शिकलो, आज थोडा साधाच, पण अतिशय महत्त्वाचा व्यायाम शिकू.
आज आपण जॉगिंग करू.
हळूहळू पळायचं.
तुम्ही म्हणाल, हॅ, ह्यात काय, आम्ही तर एका पायावर करू!
जमैकाचा उसान बोल्ट तुम्हाला माहीत आह? शंभर, दोनशे मीटर रनिंगमध्ये त्यानं वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत. जगातला सर्वोत्तम अॅथलिट अशी पदवीही त्यानं मिळवली आहे, कारण अनेक ऑलिम्पिकमध्ये त्यानं गोल्ड मेडल घेतलंय.
जगातला फास्टेस्ट रनर आहे तो, (म्हणजे होता, कारण त्यानं रिटायरमेण्ट घेतलीय आता), पण तोही म्हणतो, रनिंग करताना जॉगिंगचं महत्त्व सर्वात जास्त.
आजही तो जॉगिंग करतो.
लक्षात ठेवा, जॉगिंग किंवा कोणताही व्यायाम करताना आधी थोडा वॉर्मअप करायचा. तुम्हाला नाही, जे करत नाहीत, अजून नवखे आहेत, त्यांना मी सांगतेय.
तर आधी वॉर्मअप करायचा. घरातल्या घरात थोडं चालायचं आणि त्यानंतर जॉगिंग करायचं. आपल्याच रुममध्ये किंवा हॉलमध्ये तुम्ही पळू शकता. सुरुवातीला फक्त पाच मिनिटं. त्यानंतर हळूहळू तुम्ही वाढवू शकाल. तुम्ही या व्यायामाला साधं म्हणता, पण पाच मिनिटांतच घामटं फोडण्याची ताकद या व्यायामात आहे.
उद्या सांगा मला, हा व्यायाम करूनही कोणाला थोडासाही घाम आला नाही ते!
तुमची - ऊर्जा