बेडूक मारतो, अगदी तश्शीच उडी मारता आली पाहिजे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 06:04 PM2020-05-21T18:04:29+5:302020-05-21T18:05:50+5:30
बेडूक उडी
तुमच्यापैकी प्रत्येकाने बेडूक पाहिला असेल. पावसाळ्यात हा प्राणी मोठय़ा प्रमाणावर दिसतो. आताशा बेडकांचं प्रमाण आपल्याला कमी झालेलं दिसतं, कारण बेडकांची शिकार मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. बेडूक हळूहळू कमी होत चालल्यामुळे त्यांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं त्यांना ‘वन्य प्राणी’ म्हणून घोषित केलं आहे. वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार बेडकांना पकडणं, त्यांना मारणं यावर बंदी आलेली आहे. मी तुम्हाला मुद्दाम बेडकाविषयी जास्तीची माहिती दिली, कारण काही जण बेडकांना दगड मारतात, त्यांना जखमी करतात, म्हणून.
पण बेडकांचा व्यायाम तुम्हाला माहीत आहे?
बेडकांना उडय़ा मारताना तुम्ही पाहिलंच असेल. लहानपणी आपणही ‘बेडूक उडय़ां’चा हा व्यायाम केला असेल. काही जणांना शिक्षा म्हणूनही शाळेत बेडूक उडय़ा माराव्या लागल्या असतील.
आज हाच व्यायाम आपण करणार आहोत. त्याला म्हणायचं ‘फ्रॉग जम्प’ किंवा बेडूक उडय़ा. कुठेही हा व्यायाम करता येऊ शकतो.
कसा कराल हा व्यायाम?
1- आधी पायावर उखड बसा.
2- आता दोन्ही हात खाली जमिनीवर टेकवा.
3- दोन्ही पाय थोडे फाकवा आणि त्यामध्ये आपले दोन्ही हात ठेवा.
4- आता आपल्या शरीराचं वजन या दोन्ही हातांवर घेऊन दोन्ही पाय हलकेच उचलायचे आणि पुढे उडी मारायची.
5- पुन्हा हात पुढे घेऊन उडय़ा मारत असं पुढे जायचं
यामुळे काय होईल?
1- पायांत ताकद येईल.
2- हात बळकट होतील.
3- बायसेप्स आणि ट्रायसेप्स म्हणजे दंड आणि दंडाची मागची बाजू चांगली ताकदवान होईल.
4- खांदे मजबूत होतील.
जीममध्ये जाऊन मजबूत व्यायाम करणारे, किंवा कष्टाची कामे करणारे मजूर तुम्ह्ी पाहिले असतील. त्यांचे दंड कधी पाहिलेत. आपल्या दंडातले बेडूक त्यांना उडवता येतात.
- तुमचीच ‘बेडूकउडी’ ऊर्जा