कमरेवर हात ठेऊन गुडघा खाली जमिनीला टेकवायचा, बघा जमतं का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 07:50 AM2020-05-03T07:50:00+5:302020-05-03T07:50:01+5:30
वॉकिंग लंजेस - पाय बळकट होण्यासाठी उत्तम व्यायाम
सांगा, कोणाकोणाला व्यायामप्रकार येतात, किंवा कोणीकोणी करून पाहिलेत? मला माहीत आहे, कोणालाच सगळे व्यायाम एकदम भारी येत नसतील किंवा सगळे व्यायाम करूनही पाहिले नसतील. काही हरकत नाही.
मी सांगतेय, त्यातले सगळेच व्यायामप्रकार आपल्याला आलेच पाहिजेत, किंवा रोज ते करायलाच पाहिजेत असंही काही नाही. उलट रोज थोडे वेगवेगळे व्यायाम करून पाहिले तर जास्त मजा येते, असाच अनुभव तुम्ही सर्वानी घेतला असेल.
शिवाय आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, एकच व्यायामप्रकार, पण तो थोडासा बदलूनही करता येतो. म्हणजे त्याची डिफिकल्टी लेवल वाढवता येते. पण लक्षात ठेवा, तुम्हाला ते माहीत असेल, किंवा कोणी शिकवले असतील, तरच असे अवघड व्यायामप्रकार करून बघा. नाहीतर ते नाही केले तरी चालतील.
मागे मी तुम्हाला लंजेस कसे करायचे, हे शिकवलं होतं. म्हणजे बादशहासारखं कमरेवर हात ठेऊन गुडघा खाली जमिनीला टेकवायचा. आठवलं?
ठीक आहे. त्यातलाच थोडा वेगळा प्रकार मी तुम्हाला आज सांगणार आहे.
त्याचं नाव आहे ‘वॉकिंग लंजेस’!
कसा कराल हा व्यायाम?
1- पायात थोडं, म्हणजे खांद्याइतकं अंतर ठेवा. दोन्ही हात कंबरेवर ठेवा.
2- पाठ ताठ. बिलकूल वाकवू नका.
3- आता उजवा पाय पुढे टाका. पण मांडी जमिनीला समांतर पाहिजे. त्याचवेळी डाव्या पायाचा गुडघा जमिनीला अलगद टेकला पाहिजे.
4- अशा पद्धतीनं आपल्याला चालत जायचं आहे. पाय आलटून पालटून.
5- प्रत्येक पायाचे दहा रिपिटेशन्स करा.
हा व्यायाम आणखी अवघड करायचा असेल, तर दोन्ही हातात छोटेसे डंबेल्स घेऊनही तुम्हाला चालता येईल. पण इतक्यात ते करायची गरज नाही.
यामुळे काय होईल?
1- पायात ताकद येईल.
2- मांडय़ा ताकदवान होतील.
3- रक्ताभिसरण चांगलं होईल.
4- स्टॅमिना वाढेल.
असं बरंच काही.
बघा करून.
आणि मागे जो व्यायाम आपण केला होता, त्यापेक्षा हा अवघड आहे, की सोपा, तेही मला सांगा.