सात कचऱ्याच्या ट्रकची परेड आणि एक गिफ्ट बॅग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 01:36 PM2020-05-25T13:36:57+5:302020-05-25T13:38:55+5:30
वाढदिवसाची आगळी वेगळी भेट
आपल्याकडे घंटागाडी आल्यावर आपण काय करतो. घराच्या बाहेर येतो आणि कचरा देतो. किती साधं उत्तर. पण लास वेगासमधील हेंडरसन या शहरातली लिना रिले ही छोटीशी मुलगी मात्र तिथल्या गार्बेज ट्रक वर आणि त्यातील कामगारांवर खूप प्रेम करते. तो ट्रक कचरा उचलायला आला की लिनाला आवाज येतो. ती खिडकीतून डोकावते. मग ती आणि तिची आई त्या ट्रकजवळ जातात आणि ट्रकमधल्या कामगारांना बिस्कीटं, कुकीज सारखा खाऊ देतात. आता तर लिनाला याची सवयच लागली आहे. कधी जर घरात खाऊ नसेल तर तिची आई तिला, ‘ आपल्याकडे खाऊ नाहीये त्यांना द्यायला ‘ हे सांगते तेव्हा लिनाला खूप वाईट वाटतं. ती रडते आणि त्या निळ्या ट्रकला आपण काही खायला द्यायलाच हवं असा हट्ट करते. लिनाच्या आईला लिनाचा हा हट्ट माहिती असल्यामुळे निळ्या ट्रकमधल्या या स्वच्छता कामगारांसाठी लिनाच्या घरात रोज खाऊ असतोच.
तीन वर्षाची छोटीशी मुलगी आपल्यावर इतकं प्रेम करते हे पाहून हे स्वच्छता कामगारांनाही खूप छान वाटतं.
तिच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी लिनाला सरप्राइज द्यायचं ठरवलं. त्यांनी लिनाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ते सरप्राईज दिलं. नेहेमीप्रमाणो गाडी येण्याच्या वेळेस लिना खिडकीत उभी होती. एकामागून एक अशा सात कच:याचे निळे ट्रक तिच्या घरासमोर उभ्या राहिले. त्यातली सर्वात पहिला ट्रक छान फुलांनी सजवलेला होता. आणि त्यावर हॅपी बर्थडे लिना असं लिहिलं होतं. हे पाहून लिनाच्या आईला खूप आनंद झाला. लिना आणि तिची आई आभार माऩण्यासठी आणि नेहेमीचा खाऊ देण्यासाठी त्या ट्रकजवळ गेल्या. तेव्हा त्यातील कामगारांनी लिनाला एक गिफ्टची बॅग दिली. त्यात तिच्यासाठी चित्रकलेची वही , रंग , हॅट आणि कॉफी मग होता. आपल्याला हे मिळालेलं गिफ्ट बघून लिनाला खूपच आनंद झाला. लिनाला मिळालेल्या या आगळ्या वेगळ्या सरप्राईजमुळे लिनाच्या आईच्या डोळ्यातही आनंदाश्रू आले.