दिवसभरात मुलांना किती स्क्रीन टाइम द्यायचा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 04:28 PM2020-07-11T16:28:50+5:302020-07-11T16:30:21+5:30
सायबर स्पेसमध्ये मुलं तज्ज्ञांना काय पर्याय सुचतात? - भाग २
ऍड. वैशाली भागवत, प्रसिद्ध सायबर लॉ तज्ञ
मुलं सायबर स्पेसमध्ये गेल्यानंतर त्यांना निरनिराळ्या अडचणी येतात. स्टॉकिंगपासून बुलिंग पयर्ंत अनेक गोष्टींचा सामना त्यांना करावा लागू शकतो. आणि तो त्यांच्याच शाळेच्या, क्लासेसच्या ऑनलाईन ग्रुपमधून होऊ शकतो. किंवा शाळेच्या व्यतिरिक्त मनोरंजनासाठी गेमिंग करत असताना होऊ शकतो.
मुलांशी आपण त्यांना सहज मिळणारा मोबाईल, इंटरनेट , त्यांचं तिथलं वर्तन, लिंगभाव, लिंगभेद, ऑनलाईन जगात चालणारा लैंगिक छळ याबद्दल बोलतो का? आपल्यापैकी किती पालकांना मुलांशी ऑनलाईन धोक्यांबद्दल चर्चा करणं आवश्यक वाटतं? फारच कमी जणांना.
या संवाद न साधण्यामागे काय कारणं असू शकतात?
बहुतेकदा हा सगळा विषय पालकांनाच नीट माहित नसतो त्यामुळे मुलांशी बोलण्याचा, त्यानं धोके समजावून सांगण्याचा प्रश्नच येत नाही.
मुलं शब्दांपेक्षा कृतीतून जास्त शिकतात. घरातले मोठे इंटरनेट, मोबाईल कसा आणि कशासाठी वापरत आहेत यावरून मुलं त्यांचं वर्तन ठरवत असतात. आणि मला वाटतं याबाबतीत आपण मोठ्यांनी अजिबातच गांभीर्याने आपल्या हातातल्या फोनचा विचार केलेला नाही. एरवी मुलांच्या वर्तनाबाबत प्रचंड जागरूक असणारे पालक या एका बाबतीत मात्र अनेकदा कमालीचे निष्काळजी असलेले दिसून येतं. आजही जेव्हा शाळा ऑनलाईन सुरु झाल्या आहेत आणि वयाच्या 13व्या वषार्नंतर बहुतेक मुलं कुठल्या ना कुठल्या सोशल नेटवकिर्ंग माध्यमावर असतात अशा काळात अजूनही पालक आणि शिक्षक मुलांच्या ऑफलाईन वर्तणुकीबद्दल काळजी करताना दिसतात. मला भेटायला अनेक पालक येतात आणि ते तुम्ही काहीतरी करा अशी विनंती करत असतात. मला नेहमी प्रश्न पडतो की समस्या निर्माण झाल्यावरच उत्तर शोधण्याच्या दिशेने पालकांचा कल का असतो? खरंतर अगदी सोप्या सोप्या अनेक गोष्टी करता येऊ शकतात.
1) मुलांच्या ऑनलाईन असण्यावर नियंत्रण घाला.
2) दिवसभरात किती स्क्रीन टाइम द्यायचा हे निश्चित करा.
3) फोन लपवून ठेवणो असले प्रकार न करता त्यांच्याशी त्यांना देण्यात आलेल्या स्क्रीन टाइम बद्दल मोकळेपणाने बोला. त्यांच्याशी असलेल्या संवादात पारदर्शकता ठेवा.
4) घरातल्या सगळ्या गॅजेट्सवर अँटी व्हायरस आणि फायरवॉल असलीच पाहिजे. जेणोकरून व्हायरसचा धोका टाळता येईल.
5) स्वीकारार्ह वर्तणूक आणि अस्वीकारार्ह वर्तणूक याबद्दल मुलांशी स्पष्ट बोला. ऑनलाईन वावरताना काय करायचं आणि काय नाही याची त्यांना ऑफलाईन जगाइतकीच स्पष्ट कल्पना असायला हवी.
6) ऑनलाईन जगातले धोके जसं की सायबर बुलिंग, ग्रूमिंग, फिशिंग, फेक बातम्या आणि साईट्स, खासगी तपशील शेअर न करणं, आणि अनोळखी लोकांशी न बोलणं याबद्दलही सांगा.
(शब्दांकन: मुक्ता चैतन्य )