ऑनलाईन मुलांच्या वाटेतल्या काचा! - तर ताबडतोब सायबर सेलकडे तक्रार करा.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 04:42 PM2020-07-11T16:42:14+5:302020-07-11T16:43:19+5:30
सायबर स्पेसमध्ये मुलं तज्ज्ञांना काय पर्याय सुचतात? - भाग ३
शाळेच्या निमित्ताने, निरनिरळ्या क्लासेसच्या आणि ऑनलाईन कोर्सेसच्या निमित्ताने किंवा मुलांना ऑनलाईन जगात येणाऱ्या अनुभवांविषयी शिक्षक आणि पालकांनी बोलत केलं पाहिजे. आणि मुलं जे काही अनुभव शेअर करतील त्याकडे पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन न ठेवता बघितलं पाहिजे. ‘आमच्या वेळी नव्हतं’ हा विचार, शब्दही संवादात नकोत. कारण खरंच पालक आणि शिक्षक लहान असताना या गोष्टी मुळात अस्तित्वातच नव्हत्या. त्यामुळे लहान वयात या गोष्टी वापरताना काय वाटू शकतं याचा अनुभव मोठ्यांना नाही. शाळेच्या, क्लासच्या एखाद्या ग्रुपवर मुलामुलांमध्ये चालू असलेली चर्चा काही वेळा मुलांना आवडत नाही, त्यांना अस्वस्थता येते आणि सांगताही येत नाही. अशात पालक आणि शिक्षक जर मुलांकडे पूर्वग्रह ठेवून बघणार असतील तर मुलं मोकळेपणाने संवाद साधणार नाहीत.
अशावेळी पालक आणि शिक्षकांनी काय केलं पाहिजे?
1) सगळ्यात पहिल्यांदा कुठल्या ग्रुपवर काय चर्चा सुरु आहे ते समजून घ्या.
2) ज्या मुलाने अथवा मुलीने तक्रार केली असेल किंवा स्वत:च्या भावनांचं शेअरिंग केलेलं असेल त्याला/ तिला ही खात्री द्या की ते सुरक्षित आहेत. आणि ते मोकळेपणाने बोलू शकतात. चूक त्यांची नाहीये.
3) काहीवेळा बुलिंग बद्दल बोलायला मुलं घाबरतात. अशावेळी त्यांच्या ऑफ लाईन वर्तणुकीवर लक्ष ठेवा. एरवी आनंदी असलेलं मूल उदास आहे का? ताणाखाली आहे का? चिडचिड करतंय का? या गोष्टी बघा. आणि त्यांना विश्वासात घ्या.
5) मुलांशी फक्त भावनांविषयी, वर्तणुकीविषयी आणि धोक्यांविषयीच बोलायचं असं नाहीये. सायबर कायद्यांची मूलभूत माहितीही त्यांना द्या. सायबर पोलीस कसं काम करतात, ते कशी मदत करू शकतात आणि त्यांची मदत गरज पडेल तिथे घेतलीच पाहिजे हे मुलांना माहित असायला हवं.
6) अठरा वर्षांच्या खालच्या मुलांच्या फोनमध्ये ट्रॅकिंग सॉफ्टवेअर टाका म्हणजे मुलांच्या एकूण वावरावर लक्ष ठेवता येऊ शकेल.
7) सायबर बुलिंगमध्ये अनेकदा मुलींबद्दल अलि चर्चा हा प्रकार बघायला मिळतो. यासाठी मुलांशी आणि मुलींशीही समानता आणि लैंगिक छळ म्हणजे नेमकं काय हे बोललं पाहिजे.
8) मुलींविषयी चुकीच्या संदर्भात चर्चा ऑनलाईन करणं नुसतं गैरच नाही तर ते अत्यंत चुकीचं वर्तन आहे याची मुलांना जाणीव करून द्या आणि कुठल्याही प्रकारचा लैंगिक छळ आणि बुलिंग अजिबात सहन करायचं नाही याची जाणीव मुलींना करून देण्याची फार गरज आहे.
9) अगदी लहान वर्गातल्या मुलामुलींशी या सगळ्या संदर्भात त्यांच्या वयानुरूप संवाद साधला गेला पाहिजे.
10) समजा कुणाचा सायबर छळ होतोय असं लक्षात आलं तर ताबडतोब सायबर सेलकडे तक्रार करा.
(शब्दांकन: मुक्ता चैतन्य )