मग फुटलाय? - त्याची करा जरा मरम्मत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 07:10 AM2020-05-19T07:10:00+5:302020-05-19T07:10:01+5:30
दुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग
आपला एखादा लाडका मग असतो. अगदी लहानपणापासून आपण त्यात आधी दूध मग कॉफी किंवा एखादं हेल्थड्रींक पीत असतो. मग कधीतरी त्याचा कान फुटतो. किंवा तो पडतो आणि त्याचे टवके उडतात. ते टवकेही गोळा करून आपण पुन्हा चिकटवतो पण आई आता तो मग वापरू देत नाही. आपण हट्ट केलेला असतो त्यामुळे ती तो टाकून देत नाही. पण वापरूही देत नाही. पण आपल्याला तर मग डोळ्यासमोर हवाच असतो. आता करायचं काय? आहे की एक सोपी युक्ती.
साहित्य:
तुमचा लाडका जुना मग, सुतळी, हॉट ग्लू गन किंवा कुठलाही डिंक.
कृती:
1) मग खूप दिवसात वापरलेला नसेल तर स्वच्छ धुवून पुसून घ्या.
2) आता मगला वरपासून सुतळीने गोल गोल गुंडाळा आणि गुंडाळताना सुतळी चिकटवा.
3) तुमच्या जुन्या मगला एकदम नवा लूक येईल.
4) सुतळी वाळल्यावर तुम्ही रंगवू शकता. त्यावर सुंदर टिकल्या, कागदी फुलं चिकटवू शकता किंवा काहीच सजावट केली नाही तरीही सुतळीचा स्वत:चा लूक ही भारी दिसतो.
5) या मग मधून आता तुम्हाला दूध पिता येणार नाही पण त्याचा उपयोग तुम्ही पेनस्टॅण्ड म्हणून, तुमच्या आवडत्या गोष्टी ठेवायला, एखादं रोपटं लावायला किंवा इतर कुठल्याही कारणासाठी करु शकता जेणोकरून मग कायमचा तुमच्याजवळच राहील आणि जुना झाला म्हणून आई टाकून देणार नाही.