जे ‘बशे’ आणि ‘झोपे’ आहेत, त्यांनाही हा व्यायाम करायला मजा येईल.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 04:28 PM2020-05-15T16:28:56+5:302020-05-15T16:35:36+5:30
चक्क झोपल्याझोपल्या करायचा मस्त व्यायाम
आधी मला सांगा, तुमच्यापैकी अजूनही कोण, कोण फक्त ‘बशे’ आहेत?
म्हणजे फारसा व्यायाम करत नाहीत आणि दिवसभर नुसतं बसून काहीतरी टाइमपास करत असतात. बसूनच खेळणं, अधेमधे लोळणं. खेळही कसे? तर तेही बैठे.म्हणजे पत्ते, कॅरम, चेस, लुडो वगैरे.
तुम्ही रोज खेळता आहात, भरपूर खेळता आहात, पण या खेळांचा तुमच्या शारीरिक बळकटीसाठी फारसा उपयोग नाही. हे खेळ खेळायला काहीच हरकत नाही, पण त्या जोडीला आपले हात-पायही थोडे हलले पाहिजेत. नाहीतर ते काम करणं बंद करतील. म्हणजे बघा, एखादा दरवाजा, खिडकी आपण बरेच दिवस उघडले नाही, तर त्यात धूळ साचते, काही वेळा त्यातल्या बिजाग:या गंजतातही आणि उघडताना ते नीट उघडत नाहीत. जोर लावावा लागतो किंवा करùù करùù असा आवाज येतो.
आपल्या शरीराचे अवयवही आपण रोज वापरले नाहीत, तर त्यांनाही गंज चढतो.
आज आपण एक सोप्पा, पण अतिशय महत्त्वाचा असा व्यायाम करणार आहोत. या व्यायामाचं नाव आहे, ‘लॅटरल लेग लिफ्ट्स’!
तुमच्यापैकी जे ‘बशे’ आणि ‘झोपे’ आहेत, त्यांनाही हा व्यायाम करायला मजा येईल. कारण हा व्यायामही झोपल्या झोपल्या करायचा आहे. पण झोपेत आणि झोपेतून उठल्या उठल्या बेडवरच करायचा नाहीए.
कसा कराल हा व्यायाम?
1- खाली मॅट टाकून झोपा एका साइडला. म्हणजे एका कुशीवर.
2- दोन्ही पाय एकावर एक ठेवा.
3- एक हात डोक्याखाली घ्या.
4- आपली संपूर्ण बॉडी एका रेषेत, सरळ हवी.
5- आता वरच्या बाजूला आपला जो पाय असेल, तो अंदाजे अठरा इंच किंवा तीस ते चाळीस अंश वर उचला.
6- पाच सेकंद तो तसाच ठेवा.
7- असं दहा वेळेस करा.
8- आता हीच कृती विरुद्ध बाजूनं पुन्हा दहा वेळेस करा.
यामुळे काय होईल?
1- ‘बशे’ मंडळींना याचा फार फायदा होईल. जे बराच वेळ खुर्चीवर किंवा खाली बसलेले असतात. त्यांचे सांधे यामुळे मोकळे होतील.
2- तुमचे ग्लुट्स मसल्स स्ट्रॉँग होतील. आपण ज्या ज्या वेळी पाय हलवतो, उचलतो, चालतो, पळतो, त्यावेळी या मसल्सचा उपयोग होतो. ते स्ट्रॉँग झाले की, तुमच्यातला आळसही कमी होईल.
3- आपले गुडघे, ढुंगण आणि लोअर बॅकचे मसल्स बळकट होण्यासाठीही याचा चांगला उपयोग होईल.
- तुमचीच ‘गंज काढू’ मैत्रीण, ऊर्जा