नाचो नाचो व्यायामवाली बिट पे ..:)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 07:55 AM2020-05-01T07:55:00+5:302020-05-01T07:55:01+5:30
डान्स हा एक फार म्हणजे फारच भारी व्यायाम आहे!
मला सांगा, तुमच्यापैकी कोण लाजतं? काहीही सांगितलं की कोणाला लाज वाटते?
हा अनुभव तुमच्यापैकी जवळजवळ प्रत्येकानंच घेतला असेल. आपल्याकडे कधी पाहुणो आले असतील, आई-बाबांचे मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाइक आले असतील, तेव्हा त्यांनी तुम्हाला काहीतरी करून दाखवायला सांगितलं असेल. एखादी कविता, गाणं, डान्स.. असं काहीही.
एकतर आई-बाबांनी तुम्हाला तसं करून दाखवायला सांगितलं असेल, किंवा त्या काका-काकूंनी. कधीकधी शाळेतच शिक्षकांनी एखादी कृती तुम्हाला सगळ्यांसमोर करून दाखवायला सांगितली असेल! त्यावेळी तुम्ही किती लाजला होता, किती आग्रह केल्यावर काहींनी ती कृती केली, तर काहींनी केलीच नाही, हेही मला माहीत आहे.
खरंतर जे आपल्याला येतं, आपण घरात सहजपणो ज्या कृती करतो, त्याच कृती आपल्याला करायच्या होत्या, पण केवळ ‘लाज’ वाटल्यामुळे आपण ती कृती केली नाही.
आज आपल्याला अशीच एक कृती करायची आहे. सगळ्यांना आवडणारी.
- डान्स करायचाय!
मग तुम्ही तो आपल्या घरातल्या लोकांसमोर करा किंवा एकांतात. तुम्हाला आवडेल तिथे आणि आवडेल तसा.
एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, आपल्याला येत नाही, असं म्हणायचं नाही. आणि खरं तर जो वेडेवाकडे हातपाय हलवत नाचू शकतो, तोच खरा डान्सर असतो. कारण त्याच्यासारखं कोणालाच ठरवूनही नाचता येत नाही.
मग नाचणार आज?
कसं नाचायचं?
1- सरळ, वाकडे कसेही उभे राहा, बसा, झोपा.
2- आपल्याला आवडतील तसे हातपाय, शरीर हलवा.
3- शक्यतो आपल्या शरीराचे जेवढे अवयव हलवता येतील तेवढे हलवा. हात, पाय, डोकं, मान, कंबर, डोळे, भुवया, नाक, कान, कोपर, घोटे, गुडघे. असं काहीही.
4- तुम्हाला हा डान्स मोबाइलवर तुमचं आवडतं गाणं लावून करता येईल, टीव्ही पाहता पाहता करता येईल किंवा तुमचं तुम्हीच गाणं म्हणता म्हणता किंवा अगदी गप्प राहूनही करता येईल.
5- आपले जास्तीत जास्त अवयव हलले पाहिजेत, तसा प्रय} केला पाहिजे, हाच त्यातल्या त्यात नियम.
काय होईल या डान्सनं?
1- यामुळे तुमच्या शरीराचा सर्वागीण व्यायाम होईल.
2- तुमची लवचिकता वाढेल, पॉवर वाढेल, हातापायांतली ताकद वाढेल.
3- हृदयासाठीही हा व्यायाम चांगला आहे.
4- घरातल्याच कोणालातरी किंवा तुमचा तुम्हीच याचा व्हीडीओही मोबाईलवर शूट करा आणि अधूनमधून पाहा. किती भारी व्यायाम आहे हा, हे तुमचं तुम्हालाच कळेल.
- तुमचीच ‘डिस्को डान्सर’, ऊर्जा