आज उडायचं का आपण सुपरमॅनसारखं ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 07:50 AM2020-04-29T07:50:00+5:302020-04-29T07:50:02+5:30
हा एक फार म्हणजे फारच भारी व्यायाम आहे!
सुपरमॅन पिक्चर, सिरीज, काटरुन यांपैकी तुम्ही काय पाहिलंय?
काय भारी आहे ना? कसा हवेत उडतो. आपल्यालाही वाटतं, आपणही असंच हवेत उडावं. पिक्चर पाहता पाहताच आपण मग मनातल्या मनातच उडायला लागतो. या गावावरून त्या गावाला!
आपल्याला आज खरंच उडायचं आहे. एकदम सुपरमॅनसारखंच.
तुम्ही म्हणाल, काय शेंडय़ा लावतेय ऊर्जा तू. बरं, ठीक आहे, मी तुम्हाला सांगूनच टाकते. सुपरमॅनसारखं आपल्याला कसं उडायचंय ते!
बरोबर. तुम्ही म्हणताय, तसं आपल्याला खरोखरच उडायचं नाहीय, तशी अॅक्शन आपल्याला करायचीय.
पण आधीच सांगून ठेवते, निदान सुरुवातीला तरी फार भारी वगैरे वाटणार नाही, पण इतरांपेक्षा तुम्हाला चांगलं जमत असेल, तर मात्र खरंच फार मस्त वाटेल.
कसं बनाल ‘सुपरमॅन’?
1- आधी पोटावर झोपा. तत्पूर्वी खाली काही तरी चादर नाहीतर सतरंजी टाका, म्हणजे तुम्हाला पोटाला टोचणार नाही.
2- पोटावर झोपल्यावर हनुवटी जमिनीला टेकलेली.
3- दोन्ही हातांचे तळवे सुरुवातीला जमिनीवर टेकलेले.
4- पायांची बोटंही जमिनीला लागलेली.
5- आता एकाच वेळी आपले दोन्ही हात आणि दोन्ही पाय उचला.
6- थोडा वेळ, म्हणजे पाच सेकंद तसेच राहण्याचा प्रयत्न करा.
7- हात आणि पाय, दोन्हीही फार वर नेण्याचा प्रयत्न करू नका.
8- पण लक्षात ठेवा, हा व्यायाम करत असताना श्वास एकदम बंद करून ठेऊ नका.
असं दहा वेळा करा. नंतर जमायला लागल्यावर पंधरा किंवा वीस रिपिटेशन्सही तुम्हाला करता येतील.
काय फायदा होईल?
1- या व्यायामामुळे तुमच्या पाठीला मस्त ताण पडेल.
2- ज्यांना पाठीचं दुखणं आहे, त्यांचं दुखणं कमी होईल किंवा ज्यांना नाहीच आहे काही दुखणं, त्यांना भविष्यात पाठीचा त्रस होण्याची शक्यता फारच कमी होईल.
3- तुमची लवचिकता वाढेल.
4-शरीराचा बॅलन्स साधायला मदत होईल.
बघा, हा व्यायाम करून. काही दिवसांनी तुम्हालाही एकदम सुपरमॅन झाल्यासारखं वाटेल!
- तुमचीच ‘सुपरमॅन’ मैत्रीण, ऊर्जा