जादूचा दिवा असतो तशी जादूची पट्टी बनवा , एकदम EAZY!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 07:00 AM2020-04-20T07:00:00+5:302020-04-20T07:00:07+5:30
लिंबाचा थेंब टाका, पट्टी लाल! साबणाचा थेंब टाका, पट्टी निळी!
- राजीव तांबे
साहित्य :
अर्धा किलो लाल कोबी. एक लिंबू. एक चमचा साबण पावडर. गाळणं. सुरी. 2भांडी.अर्धा लिटर पाणी. ड्रॉइंगपेपर. कात्री.
तर करा सुरू :
1. प्रथम ड्रॉइंग पेपरच्या 3सें.मी. रुंद व 9सें.मी. लांब आकाराच्या काही पट्ट्या कापून घ्या.
2. लाल कोबीची पाने चिरून घ्या. ही चिरलेली पाने अर्धा लिटर पाण्यात टाकून पाणी गरम करा. किमान सहा-सात मिनीटे पाणी उकळवा.
3. पाणी लालभडक होईल.
4. पाणी थंड झाल्यावर, कोबीची पाने कुस्करा.आता पाणी जांभळे होईल.
5. हे जांभळे पाणी गाळून घ्या.या जांभळ्या पाण्यात कागदाच्या पट्ट्या भिजवा.या पट्ट्या सुकवा.
6. झाली आपली जादूची पट्टी तयार!
ही पट्टी म्हणजे लिटमस पेपर आहे.
या पट्टीवर लिंबाच्या रसाचे दोन थेंब टाका.पट्टी लालेलाल होईल.!!
दुसरी पट्टी घ्या.
या पट्टीवर किंचिंत पाण्यात मिसळून साबणाची पावडर टाका.पट्टी निळी होईल.!!
असं का होतं :
हा लिटमस पेपर आहे.
आम्लामुळे लिटमस कागद लाल होतो तर अल्कलीमुळे निळा होतो.
समजा एखादा पदार्थ या पट्टीवर टाकला पण तिच्या रंगात काहीच फरक पडला नाही, याचा अर्थ तो पदार्थ उदासीन आहे.