मातीविना शेती करता येते ? कसं शक्य आहे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 01:12 PM2020-05-09T13:12:34+5:302020-05-09T13:17:41+5:30
चला, आपण मेथी पिकवूया!
- मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग
हायड्रोपोनिक्स म्हणजे मातीऐवजी केवळ पाण्याचा वापर करून वनस्पती वाढवण्याचे शास्त्र. यात पोषकांनी समृद्ध असलेल्या द्रावणाचा वापर करतात. वनस्पतींच्या मुळांचा द्रावणातील पौष्टिक घटकाशी थेट संबंध येतो तसेच हवेतील प्राणवायूंही मुळांना थेट मिळतो.
साहित्य - अर्धी वाटी मेथीचे दाणे , स्वच्छ कापड, चाळणी, बरणी, रबर बँड. पाणी, जाळीची टोपली, त्याच्यापेक्षा थोडी मोठी टोपली अथवा ट्रे, जलमापक व वजन काटा.
कृती:- अर्धी वाटी मेथीचे दाणे घ्या. त्यांचे वजन करा. मेथीचे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या आणि थोड्या पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा (साधारण 12 तास).
सकाळी पाणी व दाणे चाळणीने अलग करा. दाणे परत धुऊन घ्या. एका ताटात ओल्या फडक्यात 24 तास झाकून ठेवा. 24 तासांनी मेथीचे दाणो अंकुरित झालेले दिसतील. अंकुरित झालेले मेथीचे दाणो एका जाळीच्या टोपलीत पसरून ठेवा. ही जाळीची टोपली पाणी भरलेल्या टोपली किंवा ट्रे वर ठेवा.
हे सर्व सावलीत ठेवा. रोजच्या रोज पाणी बदला. तीन दिवसात पाने फुटून मेथीची भाजी तयार होईल. मेथीची उंची 4 ते 6 इंच झाल्यावर मेथी खुडा. तिचे वजन करा आणि वापरायला घ्या. मेथीचे दाणे आणि मेथीची भाजी याच्या वजनात कितीपट फरक पडला?
ट्रे मधील पाण्यात थोडी साखर घालून पहा भाजीच्या वाढीत कोणता फरक पडतो? वाढ होते का खुंटते? पोषक द्रावण तयार करताना त्यात चमचाभर दूध अगर ताक घातल्यास मेथीची वाढ चांगली होते का? पहा.