डिझाइन्स करा, चित्र काढा आणि आवडलं तर खाऊन टाका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 03:38 PM2020-05-04T15:38:00+5:302020-05-04T15:38:53+5:30
मायक्रोवेव्ह पेंटिंग - गम्मत बघा तुमचे रंग मस्त फुलून येतील.
कधीतरी गंमत म्हणून वेगळंच काहीतरी करून बघितलं तर? तसंही काहीतरी खोड्या काढायला तुम्हाला आवडतंच, खरं खरं सांगा? तुम्ही खोड्या काढता म्हणजे काय करता तर तुम्ही काहीतरी वेगळं करून बघत असता, अनेकदा हे करताना इतरांना त्रस होईल की नाही हा विचार तुम्ही केलेला नसतो म्हणून मग मोठे तुम्हाला रागावतात.
तर मुद्दा वेगळं काहीतरी करून बघण्याचा आहे.
साहित्य:
मैदा, खाण्याचा सोडा, फूड कलर, पाणी, मीठ
कृती:
1. एका बाऊल मध्ये वाटीभर मैदा घ्या.
2. त्यात चमचा भर खायचा सोडा, चिमूटभर मीठ घालून पाण्यात सैलसर भिजवा.
3. कणिक भिजवतो तसा गोळा करायचा नाही. फार पातळ नाही पण सैलसर पीठ भिजवा.
4. आता तुमच्याकडे जितके फूड कलर्स आहेत त्यानुसार या पातळ पिठाचे भाग करा.
5. प्रत्येक भागात रंगाचे काही थेंब टाकून ढवळा.
6 . जर तुमच्याकडे फूड कलर नसेल तर लालसाठी बिटाचा रस, हिरव्या साठी पालकाचा रस, पिवळ्यासाठी थोडा आंब्याचा रस वापरू शकता.
7. सगळे रंगांचे बॅटर्स (म्हणजे पातळ पीठ) तयार झाले की प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरा.
8. वाण समान आणताना ज्या पिशव्या मिळतात, त्यात भरू शकता.
9. रबराने पिशव्या घट्ट बंद करा.
10. मायक्रोव्हेवमध्ये चालणारी डिश घ्या.
11. आता प्रत्येक पिशवी कॉर्नरशी बारीक कापा. म्हणजे ती कोनासारखी वापरता आली पाहिजे.
12. एक किंवा सगळे रंग वापरून डिश मध्ये तुम्हाला हवं ते डिझाइन काढा.
13. आणि ही डिश 30 ते 40 सेकंदासाठी मायक्रोव्हेव करा.
.. आणि गम्मत बघा तुमचे रंग मस्त फुलून येतील.
तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमची डिझाइन्स खाऊ पण शकता.