किडे करायचे का घरात ? एकदम भन्नाट..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 07:50 AM2020-05-03T07:50:00+5:302020-05-03T07:50:06+5:30
ते बनवण्यासाठी हवेत आइस्क्रीमचे चमचे, कागद आणि रंग!
एरवी किडे बघितले की तुमची घाबरगुंडी उडते का? नाही? भारीच. तुम्ही खूप धीट आहात. आता आपण घराच्या घरी किडे बनवू आणि आपल्या घरातल्या झाडांना खुश करूया. कसं ? चला बघूया.
साहित्य:
रंगीत कागद, कात्री, पांढरा आणि काळा कागद आणि फूड पार्सल्सबरोबर येणारे किंवा आईस्क्रीमचे छोटे लाकडी चमचे,डिंक
कृती:
1) रंगीत कागदाचे पंख कापून घ्या. कापताना ते चमच्याला चिकटवायचे आहेत या अंदाजाचे कापा. चमच्यापेक्षा खूप मोठे नकोत आणि खूप लहान नकोत.
2) पांढ?्या आणि काळ्या कागदाचे काही छोटे गोल आणि काही मोठे गोल कापायचे आहेत. जे आपण डोळे म्हणून वापरणार आहोत. काही किड्यांना छोटे डोळे द्या, काहींना चमच्याच्या डोक्यापेक्षा मोठे डोळे द्या.
3) आता एक चमचा घ्या. त्यांच्या दांडीला दोन्ही बाजूने एक एक पंख चिकटवा. आणि चमच्याचा खड्डा किड्याचं डोकं आहे असं समजा.
4) या भागाला आपल्याला डोळे चिकटवायचे आहेत.
5) पांढ?्या गोलात काळी बुबुळं काढा. काढताना तुम्हाला हवा तो लूक डोळ्यांना द्या. म्हणजे कधी बुबुळं गोलाच्या मधे, कधी एका बाजूला तर कधी दोन्ही डोळ्यांची बुबुळं दोन वेगळ्या दिशांना. तुम्ही हवं त्या पद्धतीने हे रंगवू शकता.
6) आता जे काळे गोल आहेत त्यात आपल्याला पांढरी बुबुळं काढायची आहेत.
7) त्यासाठी जर तुमच्याकडे व्हाईट मार्कर असेल तर तो वापरा. किंवा पांढरा वॉटर कलर, तेल खडू असं काहीही वापरू शकता.
8) किंवा काळ्या गोलापेक्षा थोड्या छोट्या आकाराचा पांढरा गोल कापून त्यात काळं बुबुळं काढून मग तो छोटा पांढरा गोल मोठ्या काळ्या गोलातही चिकटवून तुम्ही डोळे बनवू शकता.
9) हे डोळे तुमच्या किड्यांवर चिकटवा.
10) आणि तुमचे हे सुंदर रंगीबेरंगी किडे घरातल्या झाडांवर, पडद्यांवर, किंवा कुठेही जिथे तुम्हाला वाटेल तिथे अलगद ठेवा किंवा लटकवा.
11) चिकटवायचे असतील तर मात्र आईबाबांची परवानगी घ्यायची. त्यांनी हो म्हटलं तरच चिकटवायचे.