एक कोपरा घरातला , कह दो ये हमारा है !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 07:30 AM2020-05-23T07:30:00+5:302020-05-23T07:30:01+5:30
घरातच एक जागा शोधा, आणि घाला तिथे काय पसारा घालायचा तो!!
घरात सगळीकडे पसारा करू नको रे!’- हे वाक्य तुम्ही आजवर किती वेळा ऐकलंय? रोज किमान दोनदा? आता आपण कुठेही बसून काहीतरी खेळलो, किंवा एखादं हस्तकलेचं काम केलं किंवा चित्र रंगवलं किंवा इतर काहीही केलं की तिथे आपोआपच पसारा होतो. तो काही आपण मुद्दाम करत नाही. पण तो होतो तर खरंच. अर्थात तो पसारा आहे असं आईबाबांचं म्हणणं असतं. आपल्या दृष्टीने तो खेळ किंवा रंगच असतात. पण ते बरोब्बर कोणाच्या तरी पायाने सांडतात आणि मग चारही बाजूंनी आपल्या नावाने आरडाओरडा होतो. त्यावर उपाय काय? तर आपलं काम किंवा खेळणं झाल्याबरोब्बर तो सो कॉल्ड पसारा उचलून टाकायचा, सगळं सामान आवरून ठेवायचं आणि ती जागा स्वच्छ चकाचक करून ठेवायची. हे! हे! हे! काहीही !!! जमणार आहे का आपल्याला? तर नाही! मग काय रोज बोलणी खायची? तर तेही नाही! मग करायचं काय?
तर आपल्या घरात आपला स्वत:चा असा एक कोपरा बनवायचा आणि सगळा पसारा तिथेच घालायचा. पण, तो कोपरा काही साधासुधा ठेवायचा नाही. तो कोपरा मस्त डेकोरेट करायचा. हा कोपरा हॉलमधला असू शकतो, गॅलरीतील असू शकतो किंवा कुठलाही असू शकतो. तो आधी मस्त तुम्हाला पाहिजे तसा डेकोरेट करा. त्यासाठी तिथे तुमच्या नेहेमी लागणा?्या वस्तू नीट रचून ठेवा. एखादी मस्त झाडाची कुंडी ठेवा. एखादं छोटं शेल्फ जर तुम्हाला मिळालं तर त्यात तुमच्या वस्तू ठेवा. आणि मग तुमच्या सगळ्या गोष्टी तिथेच बसून करा. पण तो कोपरा असा भारी डेकोरेट करा की त्याकडे बघून मोठ्या माणसांना पण तिथे येऊन बसावसं वाटलं पाहिजे. कारण किती झालं तरी ‘आपण आपण आहोत’ . काय?