भागो ! पण कसं ? घरातल्या घरात कसं पळणार ? - तर 'असं '!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 02:00 PM2020-04-13T14:00:45+5:302020-04-13T14:04:42+5:30
दर आठवडय़ाला थोडं थोडं अंतर वाढवायचं. मग बघा, कसल्लं भारी वाटतं ते.
मी रोज तुम्हाला जे व्यायाम शिकवतेय, ते तुम्ही करून पाहताहात ना? नाहीतर मी तुम्हाला शिकवायचं आणि तुमचं आपल्या शाळेतल्या अभ्यासाप्रमाणो! पुढचं पाठ, मागचं सपाट! तर मी सांगितलेले सगळे व्यायाम लक्षात ठेवा, पण सगळे एकाच वेळी करू नका!
पण त्याला एक अपवाद आहे. ते म्हणजे वॉर्मअपचे व्यायाम. ते तुम्ही रोज करताहात ना? वॉर्मअप केल्याशिवाय कधीच, कोणताच व्यायाम करायचा नाही, हा एक नियमच तुम्ही बनवून टाका. नाहीतर आपल्या शरीराला इजा होऊ शकते. वॉर्मअपमुळे आपलं शरीर पुढच्या मोठय़ा व्यायामासाठी तयार होतं.
आज मी तुम्हाला शिकवणार आहे रनिंग!
तुम्ही म्हणाल, रनिंग ही काय शिकायची गोष्ट आहे का? मी पाहिलंय तुम्हाला अनेकदा, ‘ढू’ला पाय लावून पळताना, पण ते बरोबरच असेल, असं नाही. नीट शास्त्रीय पद्धतीनं पळालं नाही, तर दुखापत होऊ शकते.
सध्याच्या परिस्थितीत तुम्हाला पळायला फार जागा नाही, पण त्यातल्या त्यात थोडी मोठी जागा, आपल्या बिल्डिंगची टेरेस. इत्यादि ठिकाणी तुम्ही धावू शकता.
कशी कराल रनिंग?
1- आधी आपल्या पायात, आपल्या मापाचे, रनिंगचे थोडे चांगले शूज घालायचे. थोडं वॉर्मअप, जॉगिंग आणि मग रनिंग.
2- पळताना समोर बघायचं, पाठ ताठ. किंचित थोडंसं पुढे झुकलेलं.
3- पळताना आपल्या हाताचा नव्वद अंशाचा कोन झाला पाहिजे. ते अगदीच गबाळेपण सोडायचे नाहीत आणि एकदम घट्ट पण धरून ठेवायचे नाहीत.
4- टाचेवर पळायचं नाही आणि बोटांवरही पळायचं नाही. पळताना आपल्या पायाचा पुढचा भाग; ज्याला ‘मिडफूट’ म्हटलं जातं, तो अलगदपणो जमिनीवर टेकला पाहिजे. पाय न आपटता पळायचं.
5- दर आठवडय़ाला थोडं थोडं अंतर वाढवायचं. मग बघा, कसल्लं भारी वाटतं ते.
तुमचीच ‘पळपुटी’ फ्रेंड, - ऊर्जा