फुगलेल्या फुग्याचा बाउल ! तो "असा"बनवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 07:50 AM2020-05-02T07:50:00+5:302020-05-02T07:50:02+5:30
फुगलेल्या फुग्यापासून बनवायची एक भारी वस्तू
तुम्हाला तुमच्या वस्तू जसं की खोडरबरं, शार्पनर आणि इतरही स्टेशनरी ठेवायला काही ना काही हवं असतं. उगाच त्यासाठी आईबाबांकडे हट्ट कशाला करायचा? आणि पैसे तरी खर्च का करायचे ना? त्यापेक्षा आता घरीच मस्त बाउल बनवा.
साहित्य:
मागच्या वर्षीच्या वाढदिवसाच्या वेळी शिल्लक राहिलेला फुगा, बीड्स, रंगीत कागद, दोरे किंवा असं कुठलंही टाकाऊ किंवा टिकाऊ साहित्य, फेविकॉल.
कृती:
1) तुम्हाला जेवढ्या मोठ्या आकाराचा बाउल बनवायचा आहे त्यानुसार फुगा फुगवून घ्या.
2) ज्या बाजूने तुम्ही गाठ मारलेली आहे ती बाजू वर ठेवा.
3) आता खालून बीड्स, टिकल्या, दोरा, कागद असं सगळं चिकटवायला लागा.
4) निम्मा फुगा या सगळ्या साहित्याने चिकटवून घ्या.
5) चिकटवताना त्यातल्या त्यात रंगसंगती होईल असं बघा.
6) आता सगळं व्यवस्थित वाळू देत.
7) त्यानंतर फुगा सरळ फोडून टाका.
8) आणि गंमत बघा. तुमचा बाउल तयार आहे. त्यातला फुटलेला फुगा काढून घ्या.
9) समजा तुमच्या बाऊलला नीट बेस नसेल तर त्याखाली एखादा फ्लॅट तुकडा चिकटवा.
10) आणि तुम्हाला हव्या त्या वस्तू त्यात ठेवा.