फ्रेंडशिप ब्रेसलेट "असे " बनवा , एकदम सॉप्पे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 02:42 PM2020-05-04T14:42:53+5:302020-05-04T14:43:54+5:30
.. पण त्यासाठी तुम्हाला लोकरीच्या वेण्या घालाव्या लागतील
कित्ती बोअर होतंय ना, शाळा चालू असायला हवी होती असं वाटतंय ना, मित्रमैत्रिणी भेटत नाहीत, धम्माल दंगा करता येत नाही, नुसतं घरात बसून राहायचं. नाही म्हणायला तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींशी ऑनलाईन बोलतच असाल की. आता त्यांच्यासाठी बनवा मस्त फ्रेंडशिप बँड्स.
साहित्य:
लोकर किंवा जाड दोरा किंवा कुठल्याही रंगीत कापडाच्या अर्धा सेंटीमीटर जाडीच्या लांब पट्ट्या.
कृती:
1) आई, आजी वेणी कशी घालते तुम्हाला माहित आहे? नाही? मग लगेच आई किंवा आजीकडून शिकून घ्या.
2) कारण आपल्याला फ्रेंडशिप बँड बनवताना लोकरीच्या/ दो?्याच्या/ कापडाच्या वेण्या घालायच्या आहेत.
3) तुम्ही लोकर/ दोरा/ कापड यापैकी जे काही घेतलं असेल ते एकाच रंगाचं घेऊ नका. आपल्याला वेगवेगळे रंग हवेत.
4) आता तुम्ही गोळा केलेल्या कुठल्याही तीन रंगांची आई/आजीने शिकवली आहे तशी वेणी घाला. साधारण तुमच्या मनगटाच माप घ्या. तेवढा गोल होईल तोवर वेणी घाला आणि खाली गाठ मारा.
5) अशा वेगवेगळ्या रंगांच्या तीन वेण्या तयार करा.
6) आता एका वेणीच्या एका साईडला डिंक लावा आणि त्या बाजूला दुसरी वेणी चिकटवा. दुसरीच्या साईडला डिंक लावून तिसरी चिकटवा.
7) तिन्ही वेण्या नीट वाळू देत. आता त्यांचा गोल करा आणि शेवटाशी गाठ मारा.
8) गाठीच्या खाली छोटं शेपूट येईल. ते दिसायला तुम्हाला आवडत असेल तर तसंच राहूद्या, नसेल आवडत तर कापून टाका.
9) झालं तुमचं ब्रेसलेट तयार.
10) लॉक डाऊन संपल्यावर जेव्हा केव्हा तुम्ही तुमच्या दोस्त लोकांना भेटाल त्यांना हे गिफ्ट नक्की द्या, तुमची आठवण म्हणून!