आईबाबा चांगले वागले तर त्यांना मेडल द्यायला नको ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 03:18 PM2020-04-27T15:18:28+5:302020-04-27T15:31:28+5:30
आई-बाबांना द्या मेडल्स!! त्यांना टाकू की खुष करून, काय?
दर वेळी आपण काहीतरी छान केलं की आईबाबा आपल्याला बक्षीस देतात. सध्या तेही घरातच आहेत, त्यामुळे तेही कंटाळून जातात. मग आईने केलेला स्वयंपाक छान झाला असेल, किंवा बाबाने घासलेली भांडी अगदी लख्ख निघाली असतील तर त्यांनाही तुम्ही छान छान शाबासकी द्या की ! त्यांनाही बरं वाटेल. त्यासाठी मस्त मेडल्स बनवली तर?
साहित्य:
घरात असलेला पुठ्ठा किंवा कुठलाही जाड कागद, साधा पांढरा कागद. अगदी जुन्या वहीचा रेघारेघांचा कागदी चालेल. रंग, कात्री, रिबिन्स. रिबिन्स नसतील तर साधा दोरा. रंगीत दोरे असतील घरात तर ते.
कृती:
1) साध्या पांढ?्या कागदाचे स्टार्स कापून घ्या.
2) पुठ्ठ्यावर किंवा जाड कागदावर ते चिकटवा.
3) तुम्हाला हव्या त्या रंगाने रंगवा.
3) त्यावर काही लिहायचं असेल तर लिहा. उदा. ऑल द बेस्ट, वेल डन. बेस्ट आई, बेस्ट बाबा असं काहीही.
4) एकदा हे स्टार्स वाळले कि कापून घ्या.
5) स्टार्सच्या वरच्या टोकावर एक छोटं भोकी पाडा.
6) या भोकातून रिबीन किंवा रंगीत दोरा ओवा आणि गळ्यात घालता येईल इतपत उंच करून दोन्ही टोकं एकत्र करून गाठ बांधून टाका.
7) असे भरपूर स्टार मेडल्स तयार करा.
8) आणि जेव्हा जेव्हा आईबाबा काहीतरी मस्त गोष्ट करतील, ज्याने तुम्ही खूप खुश व्हाल आईबाबांच्या गळ्यात ही मेडल्स घालून सेलिब्रेट करा.
9) आताच्या लॉक डाउनच्या काळात आपण एकमेकांना खुश ठेवण्याचा प्रय} केला पाहिजे.
10) आईबाबा आपल्याला खुश ठेवण्याचा प्रयन्त करतच असतात, आता आपणही करूया.