आईच्या - आजीच्या साडीची गोधडी शिवायची का ? - मज्जा :)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 03:03 PM2020-04-27T15:03:11+5:302020-04-27T15:05:48+5:30
आईच्या साडीचं पांघरुण तुम्हाला सहज शिवता येईल हे, फक्त आईला थोडा मस्का लावावा लागेल!
तुम्हाला शिवता येतं? म्हणजे असं भारी काहीतरी नाही, पण निदान साधा धावदोरा घालता येतो का? ब?्याच शाळांमध्ये शिवणकाम हा एक विषय असतो. त्यात अगदी साधा धावदोरा, काजं बटणं करणो अश्या साध्या गोष्टी शिकवतात. त्या तुम्हाला येत असतील तर फारच छान. जर नसतील, तर आई / आजी / ताई / वहिनी / आत्या / मावशी यांच्यापैकी जिला वेळ असेल आणि जी तुम्हाला भाव देईल तिच्याकडून साधा धावदोरा कसा घालायचा ते समजून घ्या. ते झालं, की पुढच्या अवघड भागाकडे वळूया.
आईकडून तिची जुनी सुती साडी मिळवायची. हे काम वाटतं तितकं सोपं नाही. विशेषत: वाळवणं घालायच्या दिवसात जुन्या साड्यांना सोन्याचा भाव असतो. पण तुम्ही जर चांगले वागलात, आईची काही कामं केलीत, पापड गच्चीत वाळायला घातलेत आणि ते न खाता इमानदारीत राखलेत, तर आई तुम्हाला उदार होऊन एखादी जुनी साडी देईल. मग ती स्वच्छ धुवून घ्यायची. वाळवायची. तिला इस्त्री करायची.
मग त्या साडीची मधोमध घडी करायची. आणि मग साडीचे ते दोन पदर धावदोरा घालून एकमेकांना शिवून टाकायचे. कसे? तर आधी चारही बाजूंनी धावदोरा घालायचा. त्याला मध्ये मध्ये उलटी टीप घाला म्हणजे दोरा ओढला जाणार नाही. चारही बाजूंनी टीप घातली की मग आतला भाग पण शिवायचा. म्हणजे त्याचा गोळा होत नाही. आतला भाग तुम्ही तुम्हाला पाहिजे तसा शिवू शकता. एकाच्या आत एक असे परत चौकोन घाला किंवा एक मोठ्ठा क्रॉस काढा किंवा इतर कुठल्याही प्रकारे तिथे शिवण घाला.
हे सगळं शिवून झालं की तुमच्याकडे जगातलं सगळ्यात भारी पांघरून तयार असेल. हे पांघरून उन्हाळ्यात गार राहतं, अंगावर घ्यायला मऊ असतं, त्याची घडी लहान होते त्यामुळे तुम्ही ते कुठेही प्रवासाला नेऊ शकता, थंडीत ते घोंगडी / दुलई / कांबळ्याला आतून जोड म्हणून वापरू शकता.
आणि सगळ्यात भारी म्हणजे हे पांघरून फक्त आईचं आणि तुमचं असतं. कारण साडी तिची आणि मेहनत तुमची!