भाज्यांचं कधी जंगलबुक असतं का ? नसतं ? - मग बनवा तुम्ही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 07:50 AM2020-04-25T07:50:00+5:302020-04-25T07:50:06+5:30
दुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग
भाज्या खायचा आपल्याला कंटाळा येतोच ना, पण त्या खाल्ल्या पाहिजेत त्याच बरोबर आता एक सोपी युक्ती वापरून भन्नाट चित्र तयार करूया.
साहित्य:
वृत्तपत्र, पांढरा कागद, जुना टूथ ब्रश, भेंडीचे दोन तुकडे, दोन फ्लॉवरची फुलं, निरनिरळ्या प्राण्यांचे कापलेले आकार (हे तुम्हाला जुन्या मासिकातून किंवा पेपरमधून कापता येतील.), काळ स्केच पेन, रंग
कृती:
1) सगळ्यात पहिल्यांदा जंगल बनवूया. त्यासाठी हिरव्या रंगाच्या दोन तीन शेड्स तयार करा. आता भेंडीचा कापलेला भाग आहे तो रंगात बुडवा आणि त्याचा ठसा मारा. आधी कच्च्या कागदावर मारून बघा. म्हणजे आकार नीट येतोय ना हे लक्षात येईल.
2) कागदाच्या खालच्या बाजूने पाव कागद आपल्याला जंगल बनवायचं आहे. भेंडी, फ्लॉवर चे ठसे आणि त्यात अधून मधून झाडांचे बुंधे, वेली असं डिझाईन तयार करा.
3) जंगल झालं की, जे प्राण्यांचे आकार तुम्ही कापून घेतले होते ते वरच्या उरलेल्या भागावर ठेवा. जंगलात प्राणी कसे असतील असा विचार करून हे आकार ठेवा. अगदी एक रेषेत नकोत.
4) आता हिरव्या रंगाच्या निरनिरळ्या शेड्स मध्ये जुने ब्रश बुडवा आणि या प्राण्यांच्या आकाराच्या आजूबाजूचा सगळा पांढरा भाग ब्रश स्प्रेने हिरवा करून टाका.
5) हिरव्या रंगाच्या निरनिरळ्या शेड्स वापरा म्हणजे जंगल उठावदार दिसेल.
6) रंग वाळला की हळूच प्राण्यांचे आकार काढून घ्या. हिरव्या स्प्रेमध्ये मस्तपैकी प्राण्यांचे पांढरे आकार तयार झालेले असतील.
7) आता तुम्हाला हवं असेल तर या प्राण्यांच्या आकारांना काळ्या स्केचपेन ने बॉर्डर करा. पण आत रंग भरू नका. हे आकार पांढरेच राहू द्या.
8) तुमचं मस्त जंगल बुक तयार आहे.