दुकानात कशाला, आपलं चॉकलेट आपणच बनवू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 05:49 PM2020-05-21T17:49:13+5:302020-05-21T17:50:17+5:30
दुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग
चॉकलेट्स आणायला सारखं सारखं कुणीच बाहेर जाऊ शकत नाही सध्या. मग काय करायचं? तुम्ही चॉकलेट्स खायचीच नाहीत का? असं कुठंय? आपण एक आयडिया लढवूया.
साहित्य:
घरात उरलेली सर्व प्रकारची चॉकलेट्स, पॉप कॉर्न्स, 1 किंवा 2 केळी (चॉकलेट्सची संख्या किती आहे यानुसार केळी घ्यावीत.), मायक्रोवेव्हला चालेल असा बाउल, जाड टुथपिक्स
कृती:
1) सगळ्या प्रकारची गोळ्या चॉकलेट्स रॅपर्स काढून मायक्रोव्हेव् फ्रेंडली बाऊलमध्ये घ्या.
2) केळ्याचे आपल्या बोटाच्या पेराच्या जाडीचे काप करा.
3) पॉप कॉर्न्स तयार करून एका मोठ्या बाऊलमध्ये ठेवा. पॉप कॉर्न्स खूप मोठे असतील तर मोडून बारीक करा.
4) सगळी चॉकलेट्स असलेला बाउल मायक्रोव्हेव् मध्ये ठेवून चॉकलेट्स मेल्ट करून घ्या.
5) आता एका टुथपिकला केळ्याचा तुकडा टोचा.
6) हे टोचलेलं केळं मेल्टेड चॉकलेटमध्ये बुडवा. केळ्याला सगळीकडून मस्त चॉकलेट लागलं पाहिजे.
7) आता चॉकलेट पातळ आणि गरम असतानाच टूथपिक सकट सगळं पॉपकॉर्न्समध्ये डीप करा. चॉकलेटवर पॉप कॉर्न्सचा मस्त थर जमला पाहिजे.
8) तुमच्या टुथपिकवर तीन थर आहेत. पहिले केळं, मग चॉकलेटचं कोटिंग आणि मग पॉपकॉर्नस.
9) ह्या बनाना कॅंडीज आता फ्रिजमध्ये छान गार होऊ द्या.
10) आणि मग टूथपिक काढून पाहिजे तेव्हा या कॅंडीज खा. यात केळं असल्याने कॅंडीज फ्रिजमध्येच ठेवा. उन्हाळा असल्याने केळं बाहेर खराब होऊ शकतं आणि चॉकलेट विरघळू शकतं. स्वत: बनवलेल्या कॅंडीजची मजा घ्या.