ही सीझर किक काय असते ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 01:03 PM2020-05-09T13:03:05+5:302020-05-09T13:06:32+5:30
करा, पायांची कात्री!
मला सांगा, तुमच्यापैकी कोणाला कात्री चालवता येते?
म्हणजे कोणाला कात्रीकाम येतं. आपण शाळेत कातरकाम करतो. कधी आपल्याला कागद कापायचे असतात, कधी छोटं कापड कापायचं असतं. पण त्यासाठी सगळ्यांत महत्त्वाची असतात, आपली मोटर स्किल्स. म्हणजे आपल्या हाताच्या बोटांची हालचाल अतिशय सफाईदारपणो होणं. हीच स्किल्स आपल्याला पुढे आयुष्यात अनेक गोष्टींसाठी उपयोगी पडतात. मोटर स्किल्स चांगली असली, तर त्याचा तुम्हाला सफाईदारपणो लिहिण्यासाठी उपयोग होतो. सर्जन्सना, डॉक्टरांनाही या मोटर स्किल्सचा खूप मोठी उपयोग होतो.
व्यायामासाठीही याच कात्रीचा फार उपयोग होतो. अनेक मोठमोठे अॅथलिट, व्यायामपटू या व्यायामाचा उपयोग करतात. आपल्याला करायची आहे आपल्या शरीराची, त्यातही आपल्य पायांची कात्री!
या व्यायामाचं इंग्रजीतलं नावच मुळी आहे ‘सिझर किक’!
कशी करायची ही सिझर किक?
1- झोपा पाठीवर सरळ. पण त्याआधी खाली व्यायामाची मॅट किंवा सतरंजी जरूर घ्या.
2- आपलं संपूर्ण शरीर सरळ. हात पोटाजवळ. जमिनीला तळवे टेकलेले.
3- पायात थोडंसं, म्हणजे साधारण एक फुटाचं अंतर ठेवा.
4- आता आपले दोन्ही पाय सुमारे तीस अंशात वर उचला. हवेत. पाय गुडघ्यात वाकवायचे नाहीत.
5- लक्षात ठेवा, पण असं करत असताना आपले हात, पाठ जमिनीलाच टेकलेले हवेत. मान थोडीशी सैलसर.
6- पाय वर उचलल्यामुळे तुम्ही झोपलेले असाल, तरी तुमचा थोडा बॅलन्स जाईल. त्यामुळे त्यासाठी पाठीचा आणि तळव्यांचा आधार घ्यायचा.
7- आता तळवे आणि पाठ जमिनीवर थोडी दाबून ठेऊन आपल्या दोन्ही पायांची कात्री चालवत राहा. म्हणजे आपला उजवा पाय डावीकडे आणि डावा पाय उजवीकडे अशी कात्री फिरवत राहा.
सुरुवातीला फक्त पाच-पाच वेळा करा. पाठीत, पोटात फार दुखलं तर लगेच थांबून घ्या.
या कात्रीने काय होईल?
1- तुमचा कोअर एक्सरसाईज होईल.
2- पोटाचा व्यायाम होईल.
3- पोटाचे मसल्स हळूहळू अतिशय मजबूत होतील.
4- पाय, मांडय़ा यातलीही ताकद वाढेल.
करा आणि सांगा मला, कोणाकोणाला जमलं ते.
- तुमचीच ‘कचाकच कैची’ मैत्रीण ऊर्जा