लावा, पाठीला बोट! बघा जमतंय का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 10:32 PM2020-04-10T22:32:27+5:302020-04-10T22:37:12+5:30
कोणीच उगाचंच पाठ खाजवायची नाही. हा टाइम्पास नाही, व्यायाम आहे!
मी पहिल्या दिवशीच तुम्हाला एक व्यायाम सांगितला होता, ‘ढू’ला पाय लावून पळा म्हणून. तो व्यायाम तुम्हाला फार आवडला असेलच, कारण यापूर्वी क्वचितच तुम्ही तो केला असेल. खरोखरच जर कुत्रं पाठी लागलं असेल तेव्हा! आज असाच एक ‘खत्री’ व्यायाम मी तुम्हाला सांगणार आहे. अनेकांनी आजवर तो करून पाहिलाच नसेल.
तुमची पाठ तुम्ही कधी स्वत:च्याच हातानं खाजवली आहे? नसेलच.
पाठीला खाज आली की, फार अस्वस्थ होतं. काय करावं असं होऊन जातं. कारण तुमचा हातच पाठीर्पयत पोहोचत नाही! त्यावरची तुमची आयडियाही मला माहीत आहे. अशावेळी तुम्ही एकतर आईला हाक मारता, नाहीतर कंगव्याचा सहारा घेता!.
पण आज आपल्याला कोणाचीच मदत घ्यायची नाहीए.
काय कराल?
1. राहा सरळ उभे. छाती पुढे काढा.
2. आता डावा हात डोक्यावरुन पाठीमागे घ्या. उजव्या हातानं डाव्या हाताचं कोपर हळूहळू ढकला. बरोब्बर. हाताला थोडीशी कळ आली, तर येऊ द्या. पाच सेकंद थांबा.
3. हात खाली घ्या. आता तसंच उजव्या हातानंही करा. पाच-पाच वेळा करा.
यामुळे तुमच्या हाताची लवचिकता वाढेल. काही दिवसांनी तुमचा हात जास्त पाठीमागे जाऊ शकेल. तुमच्या हाताच्या मुव्हमेंट्स वाढतील. ब्लड सक्यरुलेशन वाढेल. एखादा दिवस जर खूप धावपळीचा गेला असेल, तर त्यादिवशी, घरी आल्यावर हा व्यायाम थोडासा करून बघा. एकदम मस्त वाटेल तुम्हाला.
बघा करून आणि सांगा मला कोणाकोणाच्या हाताचं मधलं बोट पाठीला बरोब्बर मध्यभागी लागतं ते!
(टीप : कोणीच उगाचंच पाठ खाजवायची नाही. हा टाइम्पास नाही, व्यायाम आहे!)
तुमचीच ‘खत्री’ मैत्रीण ऊर्जा