लाटू या पापड, घालूया वडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 06:25 PM2020-05-14T18:25:16+5:302020-05-14T18:28:11+5:30
आई-आजीला घरात वाळवणाच्या कामात मदत करायला जाल, तर फार मज्जा येईल तुम्हाला!
उन्हाळ्याचे दिवस म्हणजे अनेक घरातून नुसती धमाल असते. शेजारच्या मावशी / काकू येतात. पापड / कुरडया / वडे असे वाळवणाचे पदार्थ बनवायला आईला मदत करतात. मग कधीतरी आई शेजारच्या घरी जाते आणि त्यांना हेच सगळे पदार्थ करायला मदत करते. आणि आपण मात्र त्यातल्या पापडाच्या लाट्या आणि कुरडयांचा चीक आपल्याला कधी मिळेल आणि जर सुखासुखी नाही मिळाला तर आपल्याला तो कधी पळवता येईल याकडे लक्ष ठेऊन असतो.
ज्यांच्या घरात दर वर्षी वाळवणाचे पदार्थ होतात त्यांच्या घरी यंदा मात्र संकट आलेलं आहे. करोनाच्या भीतीने शेजारच्या मावशी / काकू दर वर्षीसारख्या सहज येऊ शकत नाहीयेत. हे पदार्थ करायचे कसे ते आईला / आजीला पक्कं माहिती आहे, पण वर्षभरासाठी पदार्थ करून ठेवायला जितकी माणसं मदतीला लागतात ती मात्र त्यांच्याकडे नाहीयेत.
याउलट काही घरं अशीही आहेत जिथे एरवी हा सगळा घाट कोणी घालत नाही. पण यावर्षी लॉक डाऊन मुळे घरातच आहोत तर करूया आपणही चार पदार्थ असं म्हणून आईला हे सगळं करण्याची इच्छा आहे. पण तिच्याही समोर प्रश्न तोच आहे - बरोबर करायला कोणी नाही!
आपण जॉईन होऊया की! यावर्षी लाटू या पापड, घालूया वडे!! आणि हे सगळं अगदी सुरुवातीपासून करूया. म्हणजे डायरेक्ट पापड लाटायच्या वेळी नाही जायचं. आधीपासून बघायचं. कुरडयांचा घाट कधी घेतात? किती दिवसांनी कुरडया घालतात? कुठल्या पापडाची उकड / खिशी घेतात?
यातून तुम्हाला तीन गोष्टी मिळतील. पहिलं म्हणजे ज्ञान आणि कौशल्य मिळेल. दुसरं म्हणजे घरात भाव मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरपूर पापडाच्या लाट्या मिळतील, आणि त्याही हक्काने!