समुद्रात किती थेंब पाणी असतं मोजता येईल का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 01:11 PM2020-04-11T13:11:25+5:302020-04-11T13:15:06+5:30
तळ्यातल्या पाण्यात एकूण किती थेंब आहेत, हे आपल्याला मोजता येऊ शकतील का?
- मराठी विज्ञान परिषद
एका तळ्यात पाण्याचे किती थेंब असतील? मोजायचे?
किती असतील शंभर? हजार? लाख? कोटी? अब्ज?
एक एक थेंब मोजेपयर्ंत कंटाळा येईल किंवा पावसाळा येईल आणि तळे आणखी पाण्याने भरून जाईल.
पटापट मोजायची काही तरी युक्ती काढली पाहिजे...
पण त्या आधी आपल्याकडे एक ड्रॉपर पाहिजे.
शाई भरायचा नसेल तर औषधाचा चालेल किंवा डोळ्यात औषध घालायची बाटली चालेल.
ड्रॉपर नसेल तर अशी कोणती तरी गोष्ट पाहिजे की तिच्यामुळे पाणी थेंबाथेंबाने सोडता येईल.
बॉलपेनची रिकामी रिफील चालेल. शाई संपलेलं स्केच पेन चालेल.
स्ट्रॉ चालेल, बारीक टोकाची नळी चालेल. बारीक सोडलेला किंवा गळका नळ चालेल
किंवा तुमच्या हाताशी असेलेलं कोणतंही साधन चालेल.
ते मिळालं की एक चहाचा चमचा घ्या.
मग आपल्या ड्रॉपरचा वापर करून एका चहाच्या चमच्यात किती थेंब पाणी मावते ते मोजा.
मग एक डाव घ्या. त्यात किती चहाचे चमचे पाणी मावते?
एक वाटी घ्या तिच्यात किती डाव पाणी मावते?
एक छोटे पातेले घ्या. पातेल्यात किती वाट्या पाणी मावते?
असे करत करत एक लिटर आकारमानात किती पातेली? किती वाट्या? किती डाव? किती चमचे? किती थेंब पाणी मावते तुम्हाला मोजता येईल.
तळ्यात किती लिटर पाणी आहे हे समजले की किती थेंब पाणी असेल याचे गणित तुम्ही करू शकाल....