मोठ्या माणसांनी लहान मुलांकडून खूप गोष्टी शिकल्या पाहिजेत , असं ती का म्हणते ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 04:09 PM2020-03-28T16:09:28+5:302020-03-28T16:13:15+5:30
अडोराचं टेड-टॉक! ती म्हणते, मोठय़ा माणसांनी आम्हा मुलांकडून खूपच गोष्टी शिकल्या पाहिजेत !
किती वेळ पुस्तकं वाचणार? कितीवेळ स्वयंपाक घरात मदत करणार? हे सगळं करून झाल्यावरही चिक्कार वेळ उरतोच. शिवाय आई, कुणा मित्र-मैत्रिणींकडेही जाऊ देत नाही. साधं बिल्डिंगच्या खाली खेळायलाही पाठवत नाही. मग मुलं मोबाइलवर काहीतरी बघणारच ना? - तर बघणारच!! पण मग उगीच स्क्रोलिंग करत मोबाइलवर काहीतरी बंडल बघत बसण्यापेक्षा, किंवा उगीचच गेमिंग करण्यापेक्षा एखादी धमाल साइट बघितली तर? किंवा मस्तच व्हिडीओ बघितला तर? तुमच्याच वयाची खूप मुलं मस्त व्हिडीओज बनवत असतात, कुणी एखादी साइट चालवत असतं, किंवा खास मुलांसाठी म्हणून शॉर्ट फिल्म्स असतात.
ऑनलाइन खूप बघण्यासारख्या गोष्टी असतात. आता अडोरा स्विटॉकच बघा ना. तुमच्यासारखीच चिमुरडी आहे. पण टेड टॉक या जगप्रसिद्ध व्यासपीठावर जाऊन तिचे जगातल्या तमाम मोठय़ांना चांगलंच सुनावलंय! ती म्हणते, ‘आम्हा मुलांना बालिश म्हणणारे मोठे कोण? जगातली सगळी युद्ध, गरिबी मुलांनी नाही आणली. तर मुलांनी जगाला जवळ आणण्याचं काम केलं आहे. मुलांनी फक्त प्रेम वाटलं आहे. मुलांनी मोठय़ांनाही माणूस म्हणून जगायला शिकवलं आहे. आणि तरीही मोठे मुलांच्या वागण्याला बालिश म्हणतात!’ पुढे ती तिच्या भाषणात म्हणते, आम्ही मुलं मोठय़ांकडून अनेक गोष्टी शिकतो, पण आता वेळ आली आहे मोठय़ांनी आम्हा लहान मुलांकडून चार गोष्टी शिकण्याची! मोठय़ांनी कुठल्या गोष्टी लहान मुलांकडून शिकल्या पाहिजेत हे तुम्हालाही बघायचं असेल तर ऑनलाइन जा आणि सोबत दिलेली लिंक वापरा. म्हणजे मग तुम्हाला अडोराचा टेड टॉक बघता येईल.
याचं इंग्लिश, मराठी आणि हिंदी ट्रान्स्क्रिप्टही त्या साइटवर आहे. व्हिडीओ बघता बघता, तुम्हाला हव्या त्या भाषेत तिचं भाषण तुम्ही वाचूही शकता.
हा व्हिडीओ कसा शोधायचा? :
गूगलवर जा. Adora svitak tedtalk असे शब्दा सर्चला टाका, की गूगल देईलच शोधून अडोराचा व्हिडीओ!