कोरोनावर औषध नाहीये अजून, मग लोक बरे कसे होतात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 07:10 AM2020-05-26T07:10:00+5:302020-05-26T07:10:07+5:30
लक्षात ठेवायचं की शंभरातले 97 लोक बरे होऊन घरी जातात.
कोरोनावर लस किंवा औषधं तयार झाली नाहीत तरीही काही लोक बरे होत आहेत ते कसे? - क्षितीज कांबळे, नांदेड
तुझा प्रश्न अगदी महत्वाचा आहे क्षितिज. कोरोनावर अजून कुठलंही विशिष्ठ औषध उपलब्ध नाही आणि कोरोनाला प्रतिबंध करणारी लसही नाही. कोरोनामुळे मृत्युमुखी पडणा?्या लोकांचा दर साधारण 3 टक्के आहे. म्हणजे 100 लोकांना जर कोरोनाची लागण झालेली असेल तर त्यातले 3 लोक मरण पावतात आणि 97 लोक बरे होऊन घरी परत जातात. मग आता प्रश्न पडतो तो हा की हे 97 टक्के लोक कसे काय बरे होतात?
तर प्रामुख्याने त्यांच्यात असलेल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे. आपल्या शरीरावर जेव्हा कोरोना किंवा इतर विषाणूंचा हल्ला होतो तेव्हा या बाहेरून शरीरात प्रवेश केलेल्या विषाणूंचा सामना करण्यासाठी शरीराने एक यंत्रणा उभारलेली असते. त्याला आपण म्हणतो आपली रोगप्रतिकारक शक्ती. तू हे शाळेत विज्ञानात शिकलाच असशील. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली हवी.
ती कशी चांगली ठेवता येईल बरं?
तर फळं, भाज्या खाल्ल्या पाहिजेत. चौफेर आहार घेतला पाहिजे. जंक फूड कमी केलं पाहिजे. पुरेशी झोप झाली पाहिजे. घरातल्या घरात का होईना पण पुरेसा व्यायाम हालचाली व्हायला हव्यात. हे सगळं केलं की आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
जे लोक बरे झाले आहेत , एकतर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे. दुसरं म्हणजे या आजारात जी लक्षण दिसतात त्यावर सध्यातरी औषधं दिली जात आहेत. म्हणजे ताप असेल तर ताप कमी करणा?्या गोळ्या, सर्दी आणि घशाच्या त्रसावर औषधं दिली जात आहेत. लक्षण कमी झाली की लोक बरे होऊन घरी जात आहेत. त्यामुळे आपण घाबरायचं नाही. चांगलं चुंगलं खायचं, व्यायाम करायचा आणि सर्दी खोकला ताप यातलं काहीही जाणवलं तर आपल्या नेहमीच्या डॉक्टरांशी बोलायचं. कोरोना झाला म्हणून लपवून ठेवायचं नाही. उलट लक्षात ठेवायचं की शंभरातले 97 लोक बरे होऊन घरी जातात.