ऑनलाईन शिक्षण: संधी की संकट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 04:07 PM2020-06-17T16:07:14+5:302020-06-17T16:08:34+5:30

शाळा सुरू होईर्पयतचे काही महिने मुलं ‘ऑनलाईन’च शिकणार असतील, तर चिडचिड आणि वैतागाशिवाय दुसरं काय काय करता येऊ शकेल?

online education-opportunity or challenge | ऑनलाईन शिक्षण: संधी की संकट?

ऑनलाईन शिक्षण: संधी की संकट?

Next
ठळक मुद्देएकमेकांच्या सोबतीने या संकटकाळातून तरून जाण्यासाठी हातपाय मारत राहण्यापलीकडे तसंही कुणाच्या हाती आता काय उरलं आहे?

एखादं संकट आलं, की त्याचं रुपांतर‘संधी’मध्ये करता येऊ शकेल का, याचा निदान प्रयत्न तरी सूज्ञ माणसाने करावा,असं म्हणतात. कोरोनाच्या महामारीचं संकट इतकं चहुबाजूंनी जगावर कोसळलं आहे; की संधी-सूज्ञतेचं भान ठेवण्याइतकंही त्रण अनेकांच्या अंगी उरलेलं नाही.
जून निम्मा झाला, तरी संसर्ग-भय कायम असल्याने शाळा सुरू झालेल्या नाहीत, त्या कधी सुरू होतील हे सांगता येत नाही; अशा अभूतपूर्व परिस्थितीत गोंधळलेल्या सरकारी यंत्रणा- शैक्षणिक संस्था आणि यातून मार्ग काय काढावा यावर टोकाची मतभिन्नता असलेले तज्ञ या सर्वानी देशभरात एकच धुमाकूळ उडवून दिला आहे. 
मुलांना शाळेत कसं,कधी बोलवावं या प्रश्नाचं उत्तर दिसत नसल्याने संभ्रमित सरकार.. ‘अभ्यास सुरूच झाला नाही, तर फी कशी मागणार आणि शिक्षकांचे पगार कसे करणार?’- असा अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाल्याने धास्तावलेल्या खाजगी शाळा..नोकरीचा घोर लागून राहिलेले शिक्षक आणि आपल्या मुलांच्या आयुष्यातला एक दिवस जरी शिक्षणाविना गेला तर त्यांच्या जन्माचं नुकसान होणार या भीतीने कातावलेले पालक.. या सगळ्यांसाठी सध्या एकच सक्तीचा आणि अपरिहार्य मार्ग उरला आहे : ऑनलाईन शिक्षण!
म्हणजे गुगल मिट, झूम अशा वेगवेगळ्या मार्गानी शिक्षक आणि शिक्षण या दोघांनीही घरोघरी मुलांच्या स्क्रीन्सवर पोचायचं. पालकांचे व्हॉट्सऐप ग्रुप्स करायचे. त्यावर व्हॉईस क्लिप्स आणि व्हिडिओ क्लिप्स टाकून मुलांना गृहपाठ द्यायचे! मुलं शाळेत येऊ शकत नसतील, तर शिक्षण  ‘ऑनलाईन’ पध्दतीने मुलांच्या घरोघरी पोचवायचं.
- हे सगळं सोपं नाही आणि निर्विवाद तर अजिबातच नाही.
आधी मुलांना  ‘स्क्रीन’पासून दूर ठेवायला धडपडणारे आपण सगळे आता मुलांना जबरदस्तीने स्क्रीनसमोर बसवणार, हे योग्य आहे का? या  ‘सक्ती’तून  ‘शिक्षण’ खरोखरच साधेल का? या  ‘व्हर्चुअल’ अध्यापनासाठी आवश्यक ती कौशल्यं आपल्या शिक्षकांकडे आहेत का? काही प्रायोगिक आणि साधन-संपन्न शाळा सोडल्या, तर बाकीच्या शाळांमध्ये ना शिक्षकांना ही साधनं वापरण्याचा अनुभव, ना मुलांची या शिक्षण-मार्गाशी ओळख ; त्यांना या घाईत लोटून त्याचा काही उपयोग होईल का?
शिक्षण ऑनलाईन होणार, तर प्रत्येक पालकाकडे (प्रत्येक मुलागणिक किमान एक) संगणक अगर स्मार्टफोन, वेगवान इंटरनेट जोडणी आणि भरवशाच्या वीज पुरवठ्याची सोय असावी लागणार; हे आपल्याकडे आहे का? इंटरनेट आणि वीज या क्वचित नवलाईच्या गोष्टी असलेले खेडोपाडीचे, दुर्गम भागातले पालक आणि उपलब्ध असली तरी ही साधनं विकत घेणं न परवडणारे पालक यांची मुलं या  ‘ऑनलाईन’ शिक्षण-संधीला मुकणार. त्यांच्याशी हा भेदभाव का?
- ऑनलाईन शिक्षण-सक्तीच्या मार्गापुढे अशी अनेक प्रश्नचिन्हं रोज लावली जात आहेत. कोरोनाच्या संकटाने गांगरून अशा तात्पुरत्या, तकलादू पळवाटा शोधण्यापेक्षा सरकारने शिक्षणाचा संरचनात्मक ढाचाच बदलावा, असाही प्रस्ताव काही तज्ञांनी मांडला आहे.
- या सगळ्या किंतू-परंतू ची यथायोग्य जाणीव ठेवूनच आम्ही आजपासून हा नवा प्रयत्न सुरू करतो आहोत. याचं मुख्य कारण :  ‘लोकमत’च्या वाचकवर्गात सर्वाधिक महत्वाच्या अशा तीन घटकांचं आयुष्य येते काही महिने तरी या  ‘ऑनलाईन शिक्षण’ सक्तीने ढवळून जाणार आहे : विद्यार्थी, पालक आणि शिक्षक!


चूक की बरोबर,, योग्य की अयोग्य हा चर्चा-गोंधळ चालू असताना या तीनही घटकांना  ‘ऑनलाईन शिक्षण-सक्ती’चा प्रत्यक्ष सामना करावा लागणार आहे. त्यात त्यांना मदत व्हावी, या नव्या शिकण्या-शिकवण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान कौशल्यांची माहिती मिळावी, आपल्यासारख्याच इतरांनी केलेले प्रयोग समजून घेता यावेत, दुसर्या कुणी शोधलेल्या मार्गातून आपल्या प्रश्नाचं उत्तर सापडावं; म्हणून या विशेष दैनंदिन पानाची रचना करण्यात आली आहे.
ऑनलाईन शिक्षणाबाबत योग्य-अयोग्याच्या चर्चापासून पूर्वनियोजित दुरावा राखून हे पान या  ‘आपत्कालीन पर्याया’तून निभावून जाण्याच्या पर्यायांचा आणि त्यासाठीच्या प्रयत्नांचा शोध घे ईल.
शाळा आणि शिक्षक, आई आणि बाबा आणि अर्थातच हा सारा घाट ज्यांच्यासाठी, ती मुलं या सगळ्यांना या पानात सहभागी घेण्यासाठी आम्ही निमंत्रित करत आहोत.
प्रश्न मांडा, उत्तरं सुचवा, अडचणी सांगा, मार्ग दाखवा!.. एकमेकांच्या सोबतीने या संकटकाळातून तरून जाण्यासाठी हातपाय मारत राहण्यापलीकडे तसंही कुणाच्या हाती आता काय उरलं आहे?
 

Web Title: online education-opportunity or challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.