सुरू झाली online शाळा मग पुढे काय झालं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 04:50 PM2020-06-17T16:50:31+5:302020-06-17T16:55:21+5:30
इशान आणि ईश्वरीची शाळा घरीच आली, मग पुढे काय झालं?
- गौरी पटवर्धन
चौथीत गेलेला ईशान सॉलिड म्हणजे सॉलिड खूष होता. फायनली आज त्याच्यासाठी पण व्हाट्सअप वर मेसेज आला होता. नाही तर इतके दिवस सगळे मेसेज त्याच्या नववीत गेलेल्या ईश्वरीताईसाठीच यायचे. आणि मग तिला एकटीला खोलीचं दार बंद करून बाबांच्या स्मार्टफोनवर दोन तास काहीतरी बघायला मिळायचं. त्यावेळी इशानला त्याचं महत्वाचं सामान घेण्यासाठी सुद्धा खोलीत जाण्याची परवानगी नसायची.
‘पण तू करतेस काय आत बसून?’- असं विचारल्यावर ईश्वरीताईने शिष्ठपणो सांगितलं होतं,
‘अभ्यास!’
‘हॅट! अजून कुठे शाळा सुरु झालीये?’
‘आमची झालीये!’
‘.. आणि मग आमची?’
‘लहान मुलांची शाळा काही एवढी महत्वाची नसते. तुम्हाला तसाही कुठे फारसा अभ्यास असतो? मस्तीच तर करता वर्गात!’- असं म्हणून ती दोन शेंड्या उडवत तिथून निघून गेली होती. तेव्हापासून इशानला काहीही करून त्याची शाळा सुरु व्हायला पाहिजे होती. म्हणजे मग त्यालाही खोलीचं दार बंद करून बाबांच्या स्मार्टफोनवर काहीतरी बघत बसता आलं असतं. कारण ईश्वरीताईने काहीही सांगितलं, तरी एकदा खोलीचं दार लावल्याच्या नंतर ती आत बसून अभ्यास करत असेल आणि तोही फोनवर यावर इशानचा अजिबातच विश्वास बसलेला नव्हता.
‘आईबाबांना ताईचं सगळंच खरं वाटतं. पण ती आत बसून नक्की गेम्स खेळत असणार किंवा निदान यूट्यूबवर व्हिडीओ बघत असणार’, असं त्याचं पक्कं मत होतं. आणि आपली शाळा सुरु होऊन आपल्याला ती संधी मिळाली की त्या दोन तासात आपण काय काय करायचं याबद्दल त्याचे प्लॅन्स लगेच सुरु झाले होते. असेही ताईपेक्षा त्यालाच जास्त ऑनलाईन गेम्स माहिती होते.
आणि समजा त्यात थोडा वेळ अभ्यास करायला लागला तरी त्याची विशेष हरकत नव्हती. कारण तीन महिने घरात बसून तो सॉलिड कंटाळला होता. आणि या सगळ्याच्या पलीकडे ऑनलाईन शाळा म्हणजे नेमकं काय असणार? तिथे आपले मित्र भेटतील का? कसे भेटतील? याबद्दल त्याला उत्सुकता होतीच.
- म्हणूनच तो शाळा सुरु होण्याची सॉलिड वाट बघत होता. आणि अशातच अचानक शाळेतल्या टीचरचा बाबांना फोन आला होता. त्याची शाळा दोन दिवसानंतर दुपारी बारा ते एक या वेळात भरणार होती.
शाळा सुरु होण्याची इतकी वाट ईशानने कधीच बघितली नव्हती. पण शेवटी एकदाचा तो दिवस उजाडला, साडेअकरा वाजले आणि बाबा म्हणाले,
‘ईशान, इकडे ये. समजून घे की शाळा कशी चालणार आहे..’