परितेवाडी ते जपान- ऑनलाइन गप्पा पोटभर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 04:59 PM2020-05-27T16:59:06+5:302020-05-27T17:01:01+5:30
onlineशाळा म्हणजे असतं तरी काय?
- रणजितसिंह डिसले, प्राथमिक शिक्षक, परितेवाडी शाळा
ऑनलाईन शाळेची एक गंमत अशी कि या शाळेला कोणतीही भौगोलिक मर्यादा नसते. कोणीही कोणत्याही देशातील शाळेशी, तिथल्या मुलांशी बोलू शकतो. त्यांना माहिती विचारू शकतो. अर्थात एकमेकांची परवानगी असेल तरच.
तुम्हांला आठवतंय का, मागील वर्षी ऑगस्ट महिन्याच्या आसपास जपान मध्ये भूकंप झाल्याची बातमी आली होती. जपानच्या मियो होरीयो या शिक्षिकेच्या शाळेतील मुलांशी आम्ही नियमित संपर्क ठेवून असतो.
ती बातमी वाचून आमच्या शाळेतला ओम म्हणाला, ‘ सर आपण त्यांना विचारू न कि त्यांची शाळा भूकंपात पडली कि सुरक्षित आहे?’
मग मी मियो ची वेळ घेवून मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची विनंती केली. तिनेही अशा कठीण परिस्थितीतही आमच्याशी संवाद साधून भूकंप झाला कि तिथली मुले कशा पद्धतीने स्वत:चा बचाव करतात याचे प्रात्यक्षिक दाखवले.
अशी वेळ आपल्यावर आली तर काय करावे? याची रंगीत तालीमच तिने आमच्या कडून मुलांकडून करून घेतली.
आमच्या मुलांनी तिच्या शाळेतील मुलांसाठी पत्रे लिहिली आणि आम्ही ती पोस्टाने त्यांना पाठवली.
आपला मित्र संकटात असताना आपण त्याला मदत करू शकत नसलो तरी किमान धीर देणारे दोन शब्द तरी लिहू शकतो याच भावनेने ती पत्रे त्यांना पाठवली आमचा संवाद जरी व्हर्च्युअली होत असला तरी मुलांच्या मनात एकमेकांविषयीचा स्नेहभाव निर्माण होण्यासाठी देश, भाषा यांचा अडथळा आला नाही.
तुमचा आहे का कोणी मित्र जो आता लॉक डाऊन मध्ये स्वत:ला खूप एकटा समजतोय, असेल तर उचला फोन आणि बोला त्याच्याशी.