तुम्ही सतत गेम खेळत असाल, तर 'हा' प्रश्न तुम्हालाही पडत असेल..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 08:00 AM2020-04-28T08:00:00+5:302020-04-28T08:00:07+5:30
‘त्या’ चॅट बॉक्सशी बोलायचं का?
मी जो गेम खेळतो त्यात काही चॅट बॉक्स पण असतात. तिथे खूप अनोळखी लोकं असतात. त्यांच्याशी बोलणं सेफ असतं का?
निरंजन पाठक, पुणो
- निरंजन अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला आहेस. मुळात गेमिंग करताना तू इतका छान अलर्ट आहेस हेच मस्त आहे. तर आता लक्षात घे हे गेमिंगमधले चॅट बॉक्स आणि तिथली माणसं यांच्याशी बोलणं अनेकदा धोकादायक असू शकतं. पण तुला गेममध्ये काही तरी जिंकायला, किंवा तुमचा गेम पुढे जाण्यासाठी बोलणं आवश्यक असू शकतं. अशावेळी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
एखाद्या व्यक्तीशी चॅटिंग करताना ती व्यक्ती जर तुला योग्य वाटली नाही, त्या व्यक्तीची भाषा, त्या भाषेत जर शिव्या असतील, किंवा इतर काहीतरी चुकीच्या गोष्टी ती व्यक्ती लिहीत असेल तर चॅटिंग बंद केलेलं बरं. अनेकदा मुलांच्याबाबत फसवणुकीच्या बाबत ज्या घटना घडतात त्यात, समोरची व्यक्ती चॅटिंग करता करता कौटुंबिक, घरातल्या माणसांच्या बँकेचे डिटेल्स अशा गोष्टी विचारत असते असं दिसून आलं आहे. हे तपशील कुठल्याही अनोळखी माणसांना कधीही द्यायचे नाहीत, हे लक्षात ठेव. शिवाय बँक डिटेल्स तर ओळखीच्या माणसांनाही आईबाबांना न विचारता अजिब्बात द्यायचे नाहीत. आणि हो, गेमिंग करत असताना अनेकदा अनेक विंडोज ओपन होतात. पॉप अप्स येतात, आपल्याला माहित नसलेल्या साईटवर चुकूनही जायचं नाही. यात धोका असू शकतो.
त्यामुळे चॅटिंग करताना फक्त गेमिंगसाठी आवश्यक तितकंच बोलायचं, गरज असेल तरच बोलायचं. गेम संपला कि चॅटिंग ताबडतोब बंद करायचं. कारण समोरची व्यक्ती नक्की कोण आहे हेही आपल्याला ठाऊक नसतं अशावेळी यात धोका आहे असंच गृहीत धरलेलं बरं, नाही का?