पायथॉन आणि मुलं ? -ते नक्की कसं ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 06:15 PM2020-06-08T18:15:48+5:302020-06-08T18:45:46+5:30
पायथॉन आणि मुलं
- चेतन एरंडे
स्क्रॅच प्रोग्रामिंग ही प्रोग्रामिंगची तोंडओळख करून घेण्यासाठी अत्यंत चांगली लँग्वेज आहे. मुलांनी महिनाभरात ही लँग्वेज उत्तम प्रकारे आत्मसात केली. एकीकडे स्क्रॅच शिकण्यासाठी दुसरी बॅच सुरु झालेली असताना, पहिल्या बॅच मधल्या मुलांना पुढची ङोप घेण्याचे वेध लागले होते.
स्क्रॅचमध्ये प्रोग्रॅम लिहिताना आधीपासूनच तयार असलेले ब्लॉक वापरावे लागतात त्यामुळे अनेक मर्यादा येतात. गोष्ट बनवताना त्या मर्यादा मुलांच्या लक्षात आल्या आणि म्हणूनच त्यांना खरीखुरी जगात वापरली जाणारी लँग्वेज शिकायची होती. तयार ब्लॉक वापण्यापेक्षा स्वत:च असे ब्लॉक बनवायचे होते. म्हणून सगळ्यांनी मिळून पायथॉन ही सध्या मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी भाषा निवडली.
भाषा निवडली खरी, पण ती शिकायची कशी? हा प्रश्न होताच. अनीशने कोड कॉम्बॅट हा प्लॅटफॉर्म वापरून आपण भाषा शिकू शकतो असे सांगितले. स्नेह, निधी, कैवल्य आणि आयुष यांना देखील ही कल्पना आवडली. पुन्हा एकदा नवीन प्लॅटफॉर्म, त्यातील फिचर आणि पायथॉनमध्ये वापरले जाणारे सिंटॅक्स मुलांनी स्वत:हून शिकायला सुरुवात केली.
हे सगळं शिकताना आमच्या दृष्टीने मुलांपुढे सगळ्यात मोठे आव्हान कोणते होते तर सगळ्यांना सोबत घेत शिकण्याची गती ठरवणो. आपण शक्यतो बघतो की कुठलीही गोष्ट शिकताना ‘पहिला माझा नंबर’ असं म्हणत मुले पुढे पळत असतात. इथे मात्र पहिला नंबर मिळवण्यापेक्षा सगळ्यांना सगळं समजलंय का? हे तपासून मग पुढं जाण्यावर मुलांचा भर होता.
कोड कॉम्बॅट साधारण पंधरा दिवसात शिकून मुलांनी पायथॉनच्या अजून मुळात जाऊन मायक्रोसॉफ्ट कडून पायथॉन शिकायचं निर्णय घेतला. ही मुलं मायक्रोसॉफ्टपयर्ंत कशी पोहचली हे आपण पुढच्या भागात समजून घेणार आहोत.