वेबसाईट्स, अँप्स, गेम्स - लक्षात ठेवा हे 5 मुद्दे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 04:13 PM2020-07-11T16:13:42+5:302020-07-11T16:18:06+5:30
सायबर स्पेसमध्ये मुलं तज्ज्ञांना काय पर्याय सुचतात? - भाग 1
ऍड. वैशाली भागवत, प्रसिद्ध सायबर लॉ तज्ञ
ऑनलाईन शाळा सुरु झाल्या आहेत. ऑनलाईन शाळेत मुलांना कसं शिकवावं याविषयी खूप चर्चा सुरु आहे पण मुलांना ऑनलाईन जगात पाठवत असताना शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा विचार करणं अत्यावश्यक आहे. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या सगळ्यांशीच ऑनलाईन सुरक्षेच्या संदर्भात संवाद साधणं गरजेचं आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे जे नियम आणि मुद्दे 7 वर्षांच्या मुलांना लागू होतात ते 13 वर्षांच्या मुलांना लागू होत नाहीत. त्यामुळे सायबर स्पेसच्या संदर्भात प्रत्येक वयोगटातल्या मुलांशी त्यांच्या वयानुरूप गोष्टींविषयी चर्चा झाली पाहिजे. सायबर स्पेस असं आपण म्हणतो तेव्हा मुलांच्या संदर्भात निरनिरळ्या वेबसाईट्स, अँप्स, गेम्स आणि ऑनलाईन सर्च या सगळ्याचा विचार केला पाहिजे.
पाच महत्वाचे मुद्दे आहेत ज्यांच्या विचार पालक आणि शिक्षकांनी करायला हवा.
1) इंटरनेटचा विचार पाच टप्प्यात मुलांना करायला शिकवा. बघणं, शेअरिंग करणं, चॅटिंग, ऑनलाईन मैत्री आणि गेमिंग. या प्रत्येकासाठी सुरक्षेचे मुद्दे निरनिराळे आहेत.
2) सायबर स्पेस मधलं जे माध्यम तुमचं मूल वापरतंय उदा. वेबसाईट, अँप्स, चॅट, सोशल मीडिया, गेमिंग ते माध्यम समजून घेण्याचा प्रय} करा. ते माध्यम कसं वापरलं जातं ते बघा. स्वत: वापरून बघा. म्हणजे मुलांशी संवाद साधणं सोपं जाईल.
3) बहुतेक अँप्स,ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स यांना इन बिल्ट म्हणजे स्वत:ची अशी प्रायव्हसी आणि सिक्युरिटी वैशिष्ठ्यं असतात. त्यांची माहिती करून घ्या आणि वापरा.
4) जिथे जिथे पेरेंटल कंट्रोल फीचर्स असतात ती चालू करा आणि वापरा.
5) मुलांशी सायबर स्पेसबद्दल मोकळा संवाद साधा. सकारात्मक चर्चा करा. सतत फक्त टीका करू नका. सायबर स्पेसबद्दल संवाद साधल्यामुळे तिथे येणाऱ्या अनुभवांचं शेअरिंग मुलं करतात. किंवा काय अडचणी येतात, त्यांना काही खटकतंय का हेही मुलं सांगतात. ज्यामुळे मुलांच्या संदर्भात काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्यांची माहिती पालक आणि शिक्षकांना लगेचच मिळू शकते.
(शब्दांकन: मुक्ता चैतन्य )