इमर्जन्सी म्हणजे काय? ती कधीही, कुठेही आणि कोणावरही येऊ शकते..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 04:09 PM2020-05-29T16:09:54+5:302020-05-29T16:11:50+5:30
तुम्ही आजवर कधी इमर्जन्सी या शब्दाचा विचार केलाय का? इमर्जन्सी म्हणजे काय? ती कधी येऊ शकते? कोणावर येऊ शकते? ...
तुम्ही आजवर कधी इमर्जन्सी या शब्दाचा विचार केलाय का? इमर्जन्सी म्हणजे काय? ती कधी येऊ शकते? कोणावर येऊ शकते? कारण इमर्जन्सी म्हणजे अचानक उद्भवणारी गंभीर परिस्थिती. ती कधीही, कुठेही आणि कोणावरही येऊ शकते. ती आधी सांगून येत नाही म्हणूनच त्याला इमर्जन्सी म्हणतात. तर अशी काय काय गंभीर परिस्थिती आपल्यावर ओढवू शकते याचा तुम्ही कधी विचार केलाय का?
म्हणजे आईबाबांबरोबर ट्रेनने जात असतांना आपण चुकून एकटेच मागे राहून गेलो तर? किंवा आपण आणि आपले आजोबा असे दोघंच घरात असतांना त्यांना अचानक काही व्हायला लागलं तर? किंवा आपण सायकलवरून एकटे क्लासहून येतो. त्यात जर येतांना अंधार झाला आणि त्याच वेळी सायकल पंक्चर झाली तर? असे काय वाट्टेल ते प्रसंग आपल्यावर केव्हाही न सांगता येऊ शकतात. आणि ते प्रसंग आल्यानंतर त्याबद्दल विचार करून मग काही कृती करायला काही वेळ नसतो. मात्र असं काही तरी घडू शकतं याचा जर आपण आधीच विचार केलेला असेल, तर आपल्याला त्या संकटातून काहीतरी चांगला मार्ग काढता येऊ शकतो.
या सगळ्या इमर्जन्सीच्या परिस्थितीतून मार्ग काढणं हे बहुतेक वेळा लहान मुलांच्या कुवतीबाहेरचं असतं. पण ते निदान योग्य वेळी योग्य माणसांची मदत तरी घेऊ शकतात. पण ऐन वेळी कोणाची मदत घेणार? तर आपल्याला अशा परिस्थितीत कोणाकोणाची मदत लागू शकते याचा आधीच विचार करून त्याची एक यादी बनवून घरातल्या भिंतीवर ती चिकटवून ठेवणं हा त्यातला सगळ्यात सोपा आणि शहाणपणाचा मार्ग असतो. मग काय? घ्या कागद पेन आणि घ्या यादी करायला :
1. पोलीस
2. आगीचा बंब
3. अँब्युलन्स
4. डॉक्टर
5. घरातली मोठी माणसं
6. घरात मोठी माणसं नसतांना आपण ज्यांना फोन केला पाहिजे अशी जवळची हक्काची मोठी माणसं..