आपल्याला राग का येतो?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 06:32 AM2020-06-06T06:32:07+5:302020-06-06T06:35:01+5:30
सतत सतत राग येणं हे चांगलं आहे का?
आपल्याला राग का येतो? ऋतूजा मडावी, नागपूर
आपल्याला काहीही करण्याची इच्छा नसते आणि आई कामं सांगते. आपण एखादा मस्त गेम खेळत असतो आणि आई फोन मागते, खूप राग येतो. चिडचिड होते. का असं होतं?
राग ही माणसाची मूलभूत भावना आहे. त्याला एखादी गोष्ट आवडली नाही, मनासारखी झाली नाही की त्रस होतो आणि तोच त्रस मग रागातून व्यक्त होतो. राग सीमित स्वरूपात असेल आणि लगेच जाणारा असेल तर ठीके पण अतिसंताप, दीर्घकाळ राग धरून ठेवणं, राग आला म्हणून समोरच्याला हानी करण्याचा विचार मनात येणं या गोष्टी मात्र चुकीच्या आहेत. राग आला तरी तो लगेच गेला पाहिजे.
राग कमी करण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे 1 ते 100 आकडे मोजायचे. अगदी सावकाश मोजायचे. आकडे मोजण्याच्या नादात आपण ब?्याचदा राग विसरून जातो. तसंच लहानांपासून मोठ्यांपयर्ंत सगळ्यांनी श्वसनाचे व्यायाम केले पाहिजेत. अगदी सोपे सोपे. जसं की दीर्घ श्वसन. लांब श्वास आत घ्यायचा आणि हळूहळू सोडायचा. ही क्रिया करत असताना लक्ष संपूर्ण श्वासावर केंद्रित करायचं. असं केल्यानेही रागावर नियंत्रण ठेवता येतं आणि उठल्या सुटल्या राग येण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं.
राग येणं नैसर्गिक आहे पण त्याचा अतिरेक मात्र नको. त्यामुळे सारखा राग येत असेल, चिडचिड होत असेल तर ती कशामुळे होतेय हेही बघायला हवं. अनेकदा भलत्याच गोष्टीचा राग भलत्याच गोष्टीवर निघतो. उदा. अनेक मुलांना भूक सहन होत नाही. भूक लागली, पोटात खड्डा पडला आणि लगेच काही खायला मिळालं नाही तर त्यांची चिडचिड सुरु होते आणि त्यातून त्यांना राग यायला लागतो. पण त्याचवेळी जर त्यांनी व्यवस्थित खाल्लं तर त्यांची चिडचिडही कमी होते आणि रागही निघून जातो. त्यामुळे रागवावं पण आपण का रागावलो आहोत आणि ते योग्य आहे का याचाही विचार केला पाहिजे.